कोल्हापूर: कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही सकारात्मक बदल पाहायला मिळाले. त्यापैकीच एक महत्वाचा बदल म्हणजे नद्यांचं प्रदूषण कमी होणं. मात्र जसं अनलॉक प्रक्रिया सुरु झाली तसं नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून आलंय. कोल्हापूरची पंचगंगा नदी तर इतकी प्रदूषित झालीय की त्या नदीच्या पाण्यावर आज लाखो मासे मृत्यूमुखी होऊन तरंगतायत.

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाडच्या बांधाऱ्यावर मृत झालेले लाखो मासे पांढरे होऊन पडलेत. पंचगंगा इतकी प्रदूषित झालीय की माशांचा श्वास गुदमरल्यानं जिकडं बघाव तिकडं मृत माशांचा खच पडलाय. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा प्रश्न भेडसावत आहे. मात्र याकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं. दरवर्षी लाखो जलचर असं तडफडून मरत आहेत आणि या परिसरातील नागरिकांनाही या प्रदूषणाला सामोरं जावं लागतंय.


नागरिकांना प्रदूषणाचा त्रास
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर शेकडो गावं आहेत. मात्र या नदीचं पाणी ना जनावरांना देता येतं ना माणसांना याचा पिण्यासाठी वापर करता येतो. नदीच्या या प्रदूषणामुळं शेत जमिनीचे मोठं नुकसान होतंय. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या मेलेल्या माशांमधील अर्धमेले मासे काहीजण विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळं या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय.


अनेक आंदोलने झाली
या प्रश्नावर नागरिकांनी अनेक आंदोलनं केली. त्याला प्रतिसाद देत प्रशासन तात्पुरती कारवाई करतं आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असंच सुरु राहतं. इचलकरंजी परिसरातील औद्योगिक कारखान्यातील दुषित पाणी मोठ्या प्रमाणावर पंचगंगेत मिसळतं. त्यामुळं आता कठोर कारवाई करा अन्यथा आत्मदहन केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील आणि विश्वास बालिघाटे यांनी दिला आहे.


प्रदूषण नियंत्रण मंडळानं यामध्ये तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. जे औद्योगिक कारखाने, साखर कारखाने या प्रदूषणाला कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर लाखो जलचरांचा जीव वाचणार आहे. अन्यथा हे पाप पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या सगळ्यांचं असणार आहे अशी भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.


पहा व्हिडिओ: Kolhapur | कोल्हापूरच्या तेरवाढ बंधाऱ्यात मेलेल्या माशांचा खच



संबंधित बातम्या: