ABP Majha Impact : खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यावर महानगरपालिकेच्या जल अभियंत्याच्या आईचा 15 दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार एबीपी माझाने 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आणला. त्यापूर्वी सुद्धा एबीपी माझाने शहरातील बकाल रस्त्यांचा विषय लावून धरताना महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले होते.


एबीपी माझाने दिलेल्या दणक्यानंतर कोल्हापूर शहरातील शुक्रवारी तातडीने अभियंत्याच्या आईचा मृत्यू झालेल्या मार्गावर तसेच नंगीवली चौकापासून संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरही खडीकरण करण्यात आले. दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या दणक्यानंतर रस्त्यांचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानले. एबीपी माझाने संभाजीनगर ते नंगीवली चौक मृत्यूचा सापळा झाल्याचे वृत्त 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. मात्र, काम सुरु करताना पुन्हा एकदा महापालिकेची चिंधीगिरी समोर आली आहे. 


पूर्वी केलेल्या पॅचवर्कची "माती" आणि नव्याने परत चिंधीगिरी 


महापालिकेकडून नंगीवली चौकाकडून येणाऱ्या सुनिता बेकरीपासून रेसकोर्स चौकापर्यंत पार कचरा झालेल्या मार्गाचे काल खडीकरण करण्यात आले. नंगीवली चौकापासून संभाजीनगरच्या दिशेने येताना जी दगडी खडी उखडली होती त्यावर पुन्हा पॅचवर्क करण्यात आले आहे. हा अपवाद सोडल्यास या रस्त्यावर अजूनही शेकडो खड्डे आहे त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे पॅचवर्क दाखवण्यासाठी केलं जात आहे का? असा मुद्दा उपस्थित होतो.


रेसकोर्स नाक्याजवळ ज्या ठिकाणी खडीकरण थांबवण्यात आले आहे. तेथून अवघ्या काही फुटांवर खड्डे आहे तसेच आहेत. त्यामुळे हे पॅचवर्क झाल्यानंतर पुन्हा ते खड्डे कधी गुडघाभर होऊन जातील याचा नेम नाही. रेसकोर्सकडून नंगीवलीच्या दिशेने जातानाही शेकडो खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे काम करताना दिसले नाहीत? की त्यासाठी आणखी कोणी रक्त सांडण्याची वाट पाहणार आहेत? शहरातील अन्य मार्गावरही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. 


महापालिकेची संवेदना हरवली आहे का?


कोल्हापूर शहरामध्ये हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. त्यांना या खड्ड्यातून मार्ग काढतच मार्ग जावे लागते. शहरवासियांसह जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक या बकाल रस्त्यांनी पार वैतागून गेला आहे. त्यामुळे पॅचवर्क सुरु केलं आहे, तर त्यामध्ये गुणवत्ता असावी असे का वाटत नाही? गेल्या पाच वर्षामध्ये 21 कोटी रुपयांचे पॅचवर्क आणि 25 कोटी नवीन रस्त्यांवर खर्च करण्यात आले आहेत. असे असतानाही रस्ते दर्जेदार का होत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दररोज अपघात घडत असताना पालिका प्रशासनाची संवेदना हरवली आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 


धुळीने डोळे बाद होण्याची वेळ आली 


परतीचा पाऊस पूर्ण थांबल्याने खड्डे मुजवण्यासाठी जो मुरुम वापरला आहे त्याच्यावरून वाहने गेल्यानंतर धुळीचे लोट तयार होत आहेत. शहरातील बऱ्याच मार्गांवर मरणाला रात्र आडवी म्हणून पॅचवर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. धुळीचे लोट निर्माण होत असल्याने डोळ्याचे आणि श्वसनाचाही त्रास होऊ लागला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. त्यामुळे चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या