Kolhapur Worst Road : संपूर्ण कोल्हापूर शहरच खड्ड्यात गेल्याने परिस्थिती दिवसागणिक भयानक होत चालली आहे. शहरातील सर्वच घटकांना रस्त्यांची पार दैना झाल्याने दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या कोल्हापुरातील रिक्षा संघटनांनी एल्गार केला असून सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेला घेराव घालणार आहेत.
अॅड. बाबा इंदूलकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, चालणाऱ्यांपासून ते वाहनाधारकांपर्यंत सर्वांनाच कोल्हापूरमधील रस्त्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे ज्यांना जीवाची काळजी आहे, त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. झोपलेलं सोंग घेतलं आहे त्यांना जागं करायचं आहे. या कोल्हापूर महापालिकेची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या प्रत्येक खात्यात घोटाळा झालेला आहे. देखेंगे, दिलाएंगे, कराएंगे इतकंच सुरु आहे.
महापालिकेच्या हद्दीत लोकशाहीच शिल्लक राहिलेली नाही
बाबा इंदलकर मनपाच्या कारभारावरून चांगलेच ताशेरे ओढले. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत लोकशाहीच जिवंत राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेचं काहीच चांगलं झालेलं नाही.
फडणवीसांचे वक्तव्य दुर्दैवी
कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, राजकीय सत्तांतर आदी कारणांमुळे राज्यातील महापालिकेच्या निवडणूका होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका कधी होतील, हे देवालाच माहीत हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे इंदुलकर म्हणाले.
खडी, मुरुमाच्या धुळीने डोळ्यातील 'बुबुळ' बाहेर येण्याची वेळ!
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वातावरणात उष्णता जाणवत असल्याने रस्त्यांवरील ओलावा कमी होऊन पुन्हा एकदा धुळ उडण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील बऱ्याच मार्गावर पॅववर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. रस्ते वाळल्याने वाहने गेल्यानंतर वाहनांच्या धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे.
रेसकोर्स नाक्यापासून पंधरा दिवसांच्या आत उखडला
रेसकोर्स नाक्यापासून करण्यात आलेला रोडवर अवघ्या 15 दिवसांच्या आत खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते करत आहेत की चेष्टा करत आहेत हे समजण्यास मार्ग नाही. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या