मुंबई: वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचं भारनियमन सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर हिटमध्ये नागरिकांना भारनियमनाचा शॉक बसत आहे.
शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे.
भांडूप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज भारनियमन लागू करण्यात आलं आहे. गुरुवारी 5 ऑक्टोबरपासून हे भारनियमन लागू झालं आहे.
कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात 2200 ते 2300 मेगावॉटचे भारनियमन होत असल्यानं, कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आली आहे. भारनियमनाचं संकट वाढत आहे, त्यामुळे दिवाळीवरही भारनियमनाचं सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण कंपनीची धावपळ सुरु आहे.
राज्यात विजेची मागणी साडे सतरा हजार मेगावॅट असताना प्रत्यक्षात सोळा ते साडे सोळा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होते. यासह वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं.
राज्यात सध्या कृषी वीज बिलं थकीत आकडेवारी 20 हजार कोटींच्या घरात आहे . राज्यात 40 लाख कृषी वीज पंप आहेत. या सर्व कारणांमुळे महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ऐन ऑक्टोबर हिटमध्ये हा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारनियमन अवघ्या 4 ते 5 दिवसात कमी करु, असं साधारण 10 ते 12 दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र भारनियमन बंद करणं तर दूरच पण आहे तेच भारनियमन वाढवण्याची तयारी आता सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या
ऐन ऑक्टोबर हिटमध्ये महावितरणचा चटका, तातडीचं भारनियमन लागू