चंद्रपूर : देव देवळात नाही, तर तो माणसात असतो, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. पण अशा माणसातल्या देवाचा अनुभव चंद्रपूरमध्ये एका गर्भवती मातेला आला. भंडारा एसटी आगाराच्या एका महिला कंडक्टरने प्रवासा दरम्यान घनदाट जंगलात एका महिलेची सुखरूप प्रसूती करुन बाळ आणि आईला नव जीवनदान दिलं.


वास्तविक, काल सकाळी एक एसटी बस भांडारा आगारातून चंद्रपूर जाण्याकरीता  निघाली. या बसमधून अलिमूरला शेख ही गर्भवती महिला बाळंपणासाठी चंद्रपूरला आपल्या आईकडे निघाली होती. पण तिला राजुरा गावच्या जंगलात  प्रसूती वेदना सुरु झाल्या.

यानंतर अलिमूरची आई आणि भाऊ दोघांनाही काय करावं सुचत नव्हतं. इतक्यात एसटीची महिला कंडक्टर करुणा तिच्या मदातीला धावली. अन् तिने ताबडतोब बस थांबवली. यानंतर अलिमूरला रस्त्याच्या बाजूच्या जंगलात नेण्यात आलं.

करुणाला एसटीत रुजू होण्यापूर्वी एका खासगी रुग्णालयात काम केल्याचा अनुभव असल्याने, तिनेही आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं. यानंतर अलिमूरने या गोंडस बाळाला जन्म दिला.

अलिमूरची या आधीची दोन मुलं प्री मॅच्युअर असल्यामुळे दोन्ही मुलं देवाघरी गेली होती. यावेळीही तिच्यावर बाका प्रसंग ओढावला होता. पण करुणेच्या रुपाने देवदूतच धावून आला. जन्म देणाऱ्यापेक्षा, जीवदान देणारा मोठा असतो असं म्हणतात. करुणाताईंनी तेच पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं.