लातूर : पुण्यातल्या 'नंदिनी हॉटेल'मध्ये एक थाळी दोघांमध्ये संपवण्याचं चॅलेंज देणारा पठ्ठ्या सोनसाखळी चोर निघाला. पुण्यातल्या वडगाव शेरीत असलेल्या नंदिनी हॉटेलचा मालक राजाभाऊ राठोड पोलिसांच्या तपासामध्ये अट्टल चोर असल्याचं समोर आलं आहे.

हॉटेलमालकाच्या बुरख्याखाली असलेल्या या महाभागाला पोलिसांनी अटक कशी केली, ही मोठी रंजक गोष्ट आहे. या चोरट्याचं आणि त्याच्या चोरीचं कनेक्शन थेट मराठवाड्यात सापडलं. लातूरच्या औसा रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीतला 25 लाखांचा आलिशान बंगला याच चोरट्याचा आहे. बंगल्यातील परिसरात सीसीटीव्ही, बंगल्यात लाखोंचं इंटिरिअर...

हे एवढं कमी होतं की काय, म्हणून भामट्याने गावातील शाळेला तीन लाखांची देणगीही दिली. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्जही त्याने दाखल केला होता. लातूरच्या प्रतिष्ठित वर्तुळात वावरण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे तो पकडला गेला आणि तिथल्या तुरुंगात त्याची बिरादारशी भेट झाली.

काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यात नंदिनी हॉटेलही सरु केलं. पण बहुदा चोरी करण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असावेत. त्यामुळे राजाभाऊने पुन्हा साखळी चोरण्यास सुरुवात केली.

आता पुणे पोलिसांनी त्याला आणि त्याचा साथीदार शंकरराव उर्फ शिवा बिरादारला गजाआड केलं. तीस लाख किमतीचे दागिने, रोख रक्कम आणि गाड्याही जप्त करण्यात आल्या. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं आपण ऐकतो, पण वाल्किमीचा पुन्हा वाल्या झाल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं.