आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वारे ताशी 55 ते 75 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर गेलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय होताना दिसतोय. काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भातील बराच भाग आणि मराठवाड्यातील काही भागांवर ढग दाटलेले दिसून येत आहेत. यावरुन आपल्याला पावसाचा अंदाज बांधता येईल. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोल्हापुरात जोरदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज शहरामध्ये काल ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अचानक आलेल्या परतीच्या पावसानं गडहिंग्लजला झोडपून काढलं. त्यामुळे अख्ख्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. सुदैवाने गाव डोंगर उतारावर असल्यानं पाणी वाहून गेलं. पण तासाभराच्या पावसाने लोकांची मात्र त्रेधा उडाली. गडहिंग्लजमधल्या बाजारपेठेत तर पावसाने धुळदाण उडवली. कोल्हापूर शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस बरसला.