उस्मानाबाद : तुळजापुरातील पोलिस आणि महसूल प्रशासनातील वाद आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे. तुळजाभवानी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे पोलिसाला महसूल कर्माचाऱ्याने मारहाण केली. काल मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

यात मारहाण करणाऱ्यांमध्ये महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते, असा आरोप होत आहे. मात्र, वरिष्ठ पोलिसांच्या दबावामुळे केवळ कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बोलले जात आहे..

24 वर्षीय रेल्वे पोलिस कर्मचारी शिवराज गिरी हे घाटशीळ पार्किंग येथे महिला, पुरुष विश्रांती कक्ष आणि अभिषेक पेडपास काऊंटरजवळ भाविकांच्या रांगा लावण्यात व्यस्त होते. त्यावेळी तुळजापूर तहसिल कार्यलयातील दत्तात्रय मेनकुदळेंनी अरेरावी केली आणि गिरी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

मेनकुदळे यांच्यानंतर महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गिरी यांना मारहाण केल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला गेला नाही. केवळ कर्मचाऱ्यावरच गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे पोलिसांमध्ये आता संतापाची भावना आहे.

महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिस प्रशासन आणि महसूल विभागातील संघर्ष आणखी वाढणार असल्याचेच चित्र दिसून येते आहे.