गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एक अनोख्या प्रकारचा दगड आढळला आहे. या दगडावर कोणत्याही दगडाने किंवा लोखंडी वस्तूने मारा केल्यास मंदिरातील घंटीचा नाद होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या दगडाला ‘टिंग टिंग गोटा’ असे नाव दिले आहे.


गडचिरोली जिल्हा सौंदर्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात नैसर्गिक वनसंपत्ती भरपूर आहे. त्यामुळे अनेक आश्चर्यकारक बाबी येथील जंगलात आढळतात. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील घोटसुर येथील जंगलात असाच एक प्रकार आढळला आहे.

एटापल्लीच्या जंगलात एका दगडावरवर दगड आपटले, तर घंटा वाजल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज येतो. एटापल्ली तालुक्यातील घोटसुर गावातील जंगलात ‘टिंग टिंग गोटा’ नावाने ओळखला जाणारा हा दगड आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दगडाने मारा केल्यानंतर एखाद्या मंदिरातील घंटीचा नाद, लोखंडाचा आवाज जसा येतो तसा आवाज येतो. त्यामुळे हा दगड जिल्ह्यात कुतुहलाचा विषय बनला आहे.

एटापल्ली तालुका मुख्यालयापासून 45 किमीवर घनदाट जंगलात असलेला घोटसूर आदिवासी गाव आहे. 1500 लोकसंख्या असलेला हा गाव नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जातो. या गावात जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत. मुलभूत सुविधेपासून दूर असलेल्या या गावाला निसर्गाने मात्र भरभरून दिले आहे. या गावापासून दोन किमीवर जंगलात एका ठिकाणी काळ्या रंगाचे अनेक दगड आहेत याच दगडांमध्ये अनेक वर्षापासून एक आश्चर्यकारक दगड आहे. या गावातील अनेक पिढ्यांपासून हा दगड असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

या परिसरातील लोकांना ‘टिंग टिंग गोटा’ दगडाची माहिती होती. मात्र हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने येथे इतर बाहेरील लोक फार कमी येतात. त्यामुळे या दगडाची माहिती फक्त या परिसरातील नागरिकांपुरतीच मर्यादित होती.

पाहा व्हिडीओ :