यवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी फसली असून आता दारूबंदी करायची असेल तर संपूर्ण राज्यात करावी, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या दप्तरातून दारू तस्करी होत असल्याचं उघड झालंय. जिल्ह्यात ड्रग्स वाढले असून तस्करांनी जंगलातून मार्ग काढला आहे. परिणामी दारूबंदीचा जिल्ह्याला काहीच फायदा झाला नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्याला 17 हजार कोटींचा महसूल दारुतून मिळतो. त्यामुळे दारूबंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.


काही दिवासांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंबंधी माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या. यावरुन कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आणि समाजसेवक अभय बंग यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. सत्ता बदलताच बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर दारुबंदीला माझं समर्थन कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहीन, मग सत्ता कोणाचीही असो, अशी प्रतिक्रिया डॉ. अभय बंग यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर दिली होती. सरकार येतात-जातात, त्यानुसार मी माझ्या भूमिका ठरवत नाही. भाजप सरकारच्या विरुद्धही मी बोलत राहिलेलो आहे. त्यांनी ते वाचावं, माहिती घ्यावी, असा सल्लाही अभय बंग यांनी वडेट्टीवार यांना दिला होता.

चंद्रपूरमधील दारूबंदीचा पुनर्विचार केलेला नाही, अजित पवारांची अभय बंग यांना ग्वाही

विजय वडेट्टीवार यांनी आज (रविवार)पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीवर भाष्य केलंय. जिल्ह्यात दारूबंदी केल्याने तस्करी वाढल्याचा दावा त्यांनी केलाय. दोन वर्षात 180 कोटी रुपयांची दारू पकडली गेली. आता पकडलेल्या दारूचा लिलाव करावा आणि दारुबाबत माहिती देणाऱ्याला यासाठी बक्षीस द्यावे असा प्रस्ताव दिला आहे. राज्याला दारूतून मोठा महसूल मिळतो. त्यामुळे दारूबंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले, असल्याचं त्यांनी म्हटलंय.

दारुबंदीची समीक्षा करण्यासाठी नऊ लोकांची समिती -
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदीची समीक्षा करण्यासाठी नऊ लोकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत माहिती वडेट्टीवार यांनी काल चंद्रपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कौटुंबिक गुन्हे, अमली पदार्थांची विक्री वाढली का, दारू किती पकडली, अपघात किती झाले, या सर्वांचा आढावा घेण्याचं काम ही समिती करणार आहे. ही समिती गठीत करण्याचा मला पालकमंत्री म्हणून अधिकार आहे. या समितीचा अहवाल महिनाभरात येईल. तो मंत्रीमंडळापुढे ठेवू. ताडोबातील रिसॉर्टमध्ये दारुला परवाना दिला पाहिजे. पर्यटन विकास व्हावा म्हणून ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना ही सोय दिली पाहिजे. यासाठी मंत्रीमंडळाला सकारात्मक विचार करायला लावणार. असं वक्तव्य पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

Wardha Liquor Factory | दारू गाळण्यासाठी चक्क शेतातील गोठ्यात भूमिगत तळघर | ABP Majha