रत्नागिरी : जवळपास दोन दशकं खुंट म्हणून उपयोगात आलेल्या चिपळूण येथील गोवळकोट किल्यावरील तोफांचं पुनर्वसन करण्यात पुण्यातील इतिहास संशोधक आणि कोकणातल्या इतिहासप्रेमींना यश मिळालं आहे. संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी याबाबत माहिती दिली.
मराठे आणि ब्रिटिश सैन्यात झालेल्या 1818 सालच्या युद्धात या तोफांचा वापर करण्यात आला होता. ब्रिटिश बनावटीच्या तोफांवर ज्या खुणा दिसतात, त्या खुणा या तोफांवर नसल्याने या तोफा मराठा लष्कराने वापरलेल्या असाव्यात, असा संशोधकांचा अंदाज आहे.
गोवळकोट किल्ल्यावर 1818 साली 22 तोफा असल्याची नोंद होती. या तोफा मधल्या काळात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोवळकोट बंदरावर बोटी बांधण्यासाठी आणल्या गेल्या. बंदरावर त्या तोफा उभ्या रोवून ठेवल्या गेल्या आणि त्याला बोटींचे दोर बांधण्यात येत होते. हा प्रकार 100 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू होता.
11 तोफा भग्नावस्थेत अर्धवट पुरलेल्या स्थितीत बंदरवर पडून होत्या. इतके वर्ष त्या काढण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. हे काम करण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी 3 महिन्यापूर्वी सुरुवात केली.
मेरीटाईम बोर्ड, पुरातत्व विभाग आणि तहसीलदार चिपळूण यांच्या परवानग्या घेतल्या. ग्लोबल चिपळूण, राजे प्रतिष्ठान आणि करण्जेश्वरी मंदिर ट्रस्ट या स्थानिक संस्थांना सोबत घेऊन काम सुरु केलं. या कामाला सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला. काम बंद पाडले. तरीही दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा जोमाने सगळ्यांची सहमती घेऊन पोलीस संरक्षणात हे काम पार पडलं. सहा तोफा जमिनीतून बाहेर काढल्या आणि गोवळकोट किल्ल्यावर एका चौथऱ्यावर बसविल्या गेल्या.