मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचललं. दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा, अशी मागणी छात्र भारतीने केली आहे. छात्र भारतीने याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. 


छात्र भारतीने शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद् करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एसएससी बोर्डात यावर्षी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरून प्रवेश निश्चित केला होता. कोरोनाची परिस्थिती व त्यामुळे सर्वसामान्यांवर आलेली आर्थिक अडचण शासन जाणून आहे. तरी कृपया दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर परीक्षा शुल्कही विद्यार्थ्यांना परत करावे."




अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कसं करणार?


दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते. तसेच याव्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकनही होत असतं. याआधारावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा पार पडत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचंच असतं. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे, हा प्रश्न कायम आहे.


अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये मार्कांवर स्पर्धा असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मार्क कशाच्या आधारावर द्यायचे? असा मोठा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी एक परीक्षा घेता येईल का? या पर्यायाची चाचपणी सुरु आहे. जर अशी परीक्षा झाली तर कशा पद्धतीनं होणं अपेक्षित आहे? तसेच यासाठी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? या पर्यायांवर प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहेत. आपली मूल्यांकन पद्धत इतर बोर्डांसारखी नसल्यामुळे नेमकं काय करता येईल, यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :