मुंबई : न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.


Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा


ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 


Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती 


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. 12 अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.