मुंबई : अतिवृष्टीमुळे रायगडमधील तळई गावावर दरड कोसळल्याने हे संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. या तळई गावाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अतिशय कमी वेळेत नव्या तंत्रज्ञानाने उभी राहणारी आणि दीर्घकाळ टिकणारी घरे इथे तयार केली जात आहेत. ही घरं बनवण्याचं काम गुजरातच्या भूजमध्ये सुरू आहे. अतिशय युद्धपातळीवर ही घरं तयार करण्याच काम भुजच्या सिटेक इंजिनीअरिंग कंपनीमध्ये सुरू आहे. अवघ्या आठ दिवसात उभी राहणाऱ्या आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या या घरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.


या कारखान्यात कामगारांची रात्र-दिवस धावपळ सुरू आहे. तळई गावच्या पुनर्विकासासाठी आणि या दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांचे अश्रू पुसून त्यांच्या डोक्यावरील हिरवलेलं छत पुन्हा निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर ही घरे निर्माण केली जात आहेत. याच कारखान्यातून तयार झालेली घर आज जगभरात अनेक ठिकाणी वसलेली आहेत. आणि हीच घरं काही दिवसात तळई गावात वसणार आहे.


फॅक्टरीत घरं तयार होतात हे ऐकून आपल्यालाही नवल वाटेल. मात्र अनेक देशांमध्ये कमी वेळेत जास्त टिकाऊ घरं आजही फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत. आणि तशीच ही  घरं गुजरातच्या भुज येथेही  तयार होत आहेत. भुजच्या फॅक्टरीत तयार झालेली घरं थेट रायगडच्या तळई गावाच्या पुनर्विकासासाठी आणली जाणार आहेत.   


कोकणातील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा लक्षात घेता ही घरं बनवली जात आहेत. या घरांच्या भिंती अतिशय मजबूत असणार आहेत सिमेंट केमिकल्स यांचा वापर करून लाईट वेट काँक्रीट पॅनल तयार केले जात आहेत. भिंतीसाठी हे पॅनल वापरले जाणारे आहेत. या भिंती फायर प्रूफ असणार आहेत. जर दुर्घटना घडून कुठल्याही प्रकारची आग लागली तरी या भिंतीमुळे ती आग पसरू शकणार नाही. तसेच उन्हाळ्यात जरी प्रचंड उष्णता वाढली तरी घरातील वातावरण थंड राहील आणि हिवाळ्यात जरी थंडी वाढली तरी घरातील वातावरण उष्ण राहील. एवढंच नाही कोकणात सोसाट्याचा वारा असतो. त्या वाऱ्यात ही घरांना काहीच होणार नाही. एवढंच नाही तर 180 प्रती तासाने वारे वाहत असेल तरी ही घरे या वादळात तग धरतील, असं सिटेक इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमरप्रकाश अग्रवाल यांनी म्हटलं आहे.


प्रत्येक घरावर सोलर पॅनल आणि वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाण्याच्या टाक्या असणार आहेत. फायर प्रूफ आणि आयसोलेशन असलेल्या घराच्या भिंतीसोबत छत ही कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन बनवण्याचं काम सुरू आहे. कोकणात मुसधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा आवाज होऊ नये आणि तापमान कंट्रोल करण्यात यावा यासाठी पफ आयसोलेशन असलेले पत्रे तयार केले जात आहेत. जेणेकरून हे छत मजबूत तर असेल आणि तापमान ही कंट्रोल करणार आहे. फायर प्रूफ भिंत आणि पफ आयसोलेशन असलेलं घराचं छत  असणार आहे. 400 चौरस फूट कार्पेट असलेलं वन बीएचके हे घर असणार आहे. त्यात हॉल, बेडरूम किचन आणि शेतीच साहित्य ठेवण्यासाठी जागा असणार आहे.


वैशिष्ट्यपूर्ण नवीन टेक्नॉलॉजी असलेलं हे घर असणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर वादळवारा असल्याने अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यासाठी या सगळ्या घरांच्या छतावरती सोलार पॅनल बसवलं जाणार आहे. जेणेकरून विद्युत पुरवठा खंडित झाला तरी घरात सोलरचा वापर करता येईल. एवढच नाही तर पावसाळ्यात वाहून जाणार पाणी अडवले जाईल आणि ते वर्षभर वापरता येईल. अशा स्वरूपाच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या प्रस्तावित आहेत. म्हणजेच तळई गावात विद्युत पुरवठा आणि पाण्यापासून वंचित राहता येऊ नये अशा स्वरूपाचं गाव वसवलं जाणार आहे.