कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यभर बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार साहेब सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
'खोटं बोल पण रेटून बोलं' याप्रमाणे शरद पवार केंद्राकडे बोट दाखवत बचाव करत आहेत. मात्र 16 वर्षे सोडली तर अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात देखील यांची सत्ता होती. मग त्यावेळी घटनादुरुस्ती का करून घेतली नाही? असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण टिकवले होते ते आरक्षण यांना टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे शरद पवार अशी विधाने करत असल्याचे देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. याआधी मी 28 वेळा याबाबत बोललो आहे, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार खोटे बोलले आहेत त्यामुळे मला माध्यमांच्यासमोर यावं लागलं आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवार यांचं वय झालं नाही का?
राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांचं वय झाला आहे.त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही,अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? त्यामुळे कुणी कुणाचं वय काढू नये, आमदारांच्या विषयावर कोर्टाने देखील सांगितलं आहे की तो राज्यपालांचा अधिकार आहे.
नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेने शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न
केंद्र सरकारमध्ये नव्याने मंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जिल्ह्यांमध्ये दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील केंद्रामध्ये असणारे मंत्री दौरा करत आहेत. नारायण राणे हे मुंबईतून जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेला शह हा त्या जन आशीर्वाद यात्रेतील बाय प्रॉडक्ट असेल असे देखील चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या :