लातूर : येत्या 5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यापुढेही टप्प्याटप्प्यानं भरती होत राहिलं आणि आता भरती प्रक्रिया थांबणार नाही, असं नवं आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलं आहे. काल लातूरमध्ये विनोद तावडेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना ही माहिती दिली.
संस्था चालकांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यास संस्था चालकांची भरती बाजूला ठेवून, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेतील शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती विनोद तावडेंनी दिली. तसेच येत्या 5 मार्चपर्यंत किमान 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचंही तावडेंनी जाहीर केलं.
डीएड, बीएड आणि टीईटी पास असलेल्यांना आपण शिक्षक झालो आहोत असं वाटतं आणि नोकरी न मिळाल्यास बेरोजगार झालो असा गैरसमज होतो. डीएड, बीएड झाल्यानंतर नोकरी मिळणारच असा समज असणे चुकीचे आहे, असं तावडे म्हणाले.
आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी फेब्रुवारी 2018 मध्ये केली होती. मात्र अद्याप ही भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. आता मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होणार असल्याचं नवं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांचं हे आश्वासन सत्यात उतरणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.
व्हिडीओ - काय म्हणाले विनोद तावडे?