सांगली : पिककर्जाच्या बदल्यात खाजगी इन्शुरन्स काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीवरून खासदार शेट्टींनी सरकारला लक्ष केलं आहे. कर्जाच्या बदल्यात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाणं हे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतल्यासारखे आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन करणार नाही. वेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू, मात्र शेतकऱ्यांवरील हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. यासंदर्भात जर शेतकऱ्यांकडून तक्रार आली तर आरबीआयच्या गव्हर्नरकडे या बँकेच्या अधिकाऱ्यांवर आणि बँकेवर कारवाई करण्यासाठी आग्रह धरेन असंही राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.


एका बाजूला निरव मोदी सारखे बँकाना टोप्या घालून जाणारे कर्जदार आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने बँकेत काम करणारे आणि शेतकऱ्यांना लुटणारे कर्मचारी दिसतात. त्यामुळे या देशाची बँकिंग व्यवस्था कुठे चाललीय हा प्रश्न देशाच्या अर्थमंत्र्यांना नक्की विचारेन असे देखील शेट्टी यांनी म्हंटलं.


शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे


शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा सरकारला डान्सबार महत्वाचे वाटतात. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैंजनाचा आवाज ऐकावा वाटत असेल, अशी टीका राजू शेट्टींनी डान्स बारच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली.


कायदेही आणि न्यायालये तीच आहेत. यापूर्वी न्यायालयाच्या संमतीनेच डान्सबारवर बंदी घातली होती. मात्र डान्सबारवरील बंदी न्यायालय उठवते, याचा सरळ अर्थ सरकारने आपली बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली नाही.


सरकारने खमकी भूमिका घेत आपली बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली असती तर कोर्टाने देखील निश्चित डान्सबारवरील बंदी उठवण्याचा निर्णय दिला नसता, असा विश्वास शेट्टींनी व्यक्त केला.