जळगाव : बीड जिल्ह्यातील बिभिषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला पदाचा गैरवापर करत व कायद्याची पायमल्ली करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी परवाना बहाल केला आहे. त्यांनी कर्तव्यात कसून आणि पदाचा गैरवापर केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


बीड जिल्ह्यातील मुरंबी (अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाच्या परवाना प्रकरणी निकाल देतांना,  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्री हे जनतेचे विश्‍वस्त आणि रक्षक असतात, बापट यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, पदाचा गैरवापर केला आहे, असे ताशेरे ओढले आहेत.
बापटांची कर्तव्यात कसूर, मंत्रिपदाचा गैरवापर केला : हायकोर्ट

मंत्री बापट यांच्यावर उच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेक प्रकरणात वारंवार ठपका ठेवला असल्याने त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. लोकायुक्त, न्यायालय या संस्थांनी या सरकारमधील  अनेक मंत्र्यांना दोषी ठरवूनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केल्याने त्यांच्या ढोंगी पारदर्शकतेचा पर्दाफाश झाला आहे, असेही मुंडे म्हणाले.

खडसे दोषी असतील तर त्यांना शिक्षा तरी द्या : जयंत पाटील
खडसे यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याने त्यांना बाहेर राहावे लागत आहे. ते कोणत्या गोष्टीत दोषी असतील तर त्यांना शिक्षा तरी द्या. नाहीतर सोडून द्या, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस हे खडसे यांच्यावर प्रेम करीत नाहीत हेच खरे. हे सगळे होत असताना आम्ही सत्तेत असताना स्वाभिमान दाखवणारे खडसे गप्प का? कोणाला घाबरत आहेत? हा आम्हालाही प्रश्न पडला आहे. खडसेंचा स्वाभिमान लवकर जागृत व्हावा अशी अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.