शिर्डी (अहमदनगर) : रामनवमी उत्सव काळातील तीन दिवसांत शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटींचं दान अर्पण केलं. उत्सवाच्या काळात साईचरणी मिळालेलं आतापर्यंतचं विक्रमी दान आहे.


ऑनलाईन देणगीतही वाढ

रामनवमीच्या तीन दिवसीय उत्सव काळात भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यावेळी झालेल्या मोजणीत साई संस्थानला एकूण 6 कोटी 32 लाखांच दान मिळालं. यात  देणगी काऊंटरवर 48 लाख रुपये तर दान पेटीत 1 कोटी 54 लाख रुपयांचे दान मिळालं असून, नोटाबंदीनंतर साईंना ऑनलाईन दान करण्याच प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन, चेक, डीडी आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही रेकॉर्ड ब्रेक 53 लाख रुपयांच दान साईंना आलं आहे.

हैदराबादच्या साईभक्ताकडून 12 किलो सोने दान

या उत्सव काळात साईंना सोन्याचं आणि चांदीच भरभरुन दान आलं. हैद्राबाद येथील भास्कर पार्थ रेड्डी यांनी 12 किलो सोन दान केलं. त्यापासून साईबाबांच्या समाधीचे कठडे बनवण्यात आले.

देणगीच्या रकमेतून काय काय केलं?

रामनवमीला संध्याकाळी विधीवत पूजा करत ते साईंच्या समाधीला बसविण्यात आले. याशिवाय 8 लाख रुपये किंमतीचं नोटा मोजण्याचे मशीन विजया बँकेने दिलं. तर साईंना या वर्षी चांदीचंही मोठ दान प्राप्त झालं असून, तब्बंल 65 किलो चांदीपासून मकर बनविण्यात आलं. साईबाबांच्या द्वारकामाईतील फोटोला मकर बसवण्यात आलं.

साईबाबांना साईभक्त रोख स्वरुपात दान पेटीत दान टाकतात. एका भक्तांने साई संस्थानला दोन चांदीच्या दानपेटया अर्पण केल्या असून, या साई समाधीजवळ दान टाकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

साई संस्थानाकडे सध्या किती संपत्ती?

शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी दान करण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या साई संस्थानची विवीध बँका, रोखे असे मिळून विविध राष्ट्रीयकृत बँकांत 1800 कोटींच्या ठेवी आहेत. तर साई संस्थानकडे आज मितीला 380 किलो सोने आणि 4428 किलो चांदी जमा आहे. साई संस्थानचा खर्च प्रामुख्याने भक्तांसाठी चालविल्या जाणाऱ्या प्रसादालय, रुग्णालये, शाळा, कर्माचाऱ्यांचे पगार यावर मोठ्या प्रमाणात केला जातो.