उदयनराजेंना भाजपने होल्डवर ठेवण्यामागची पाच प्रमुख कारणं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.
पहिलं कारण : पक्षाच्या चौकटीत न राहणारे उदयनराजे
उदयनराजे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत बसत नाहीत. पक्षाची विचारधारा सांभाळणं, त्याचा अंदाज घेऊन बोलणं याकडे उदयनराजे लक्ष देत नाहीत. (उदा. समजा उदयनराजे भाजपमध्ये गेले... आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात काही तरी विधान केलं... तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना काय वाटेल?)
दुसरं कारण : एका म्यानात दोन तलवारी कशा?
साताऱ्याचं अर्थकारण दोन राजेंच्या भोवती फिरतं... (उदयनराजे आणि त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले) शिवेंद्रराजे सध्या भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही राजेंना वाटेकरी नको.
तिसरं कारण : लोकसभेची जागा कुणाकडे?
युतीमध्ये साताऱ्याची लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उदयनराजे जर भाजपमध्ये गेले तर शिवसेनेला ही जागा राजेंसाठी सोडावी लागले, परंतु शिवसेना हे मान्य करेल का?
चौथं कारण : भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
फलटणच्या एका उद्योजकाला धमकावल्याचा उदयनराजेंवर आरोप आहे आणि योगायोगाने हा उद्योजक अमित शाह यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळेच भाजपचे शीर्ष नेते उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला अनुकूल नाहीत.
पाचवं कारण : पश्चिम महाराष्ट्राचा नेता कोण?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा आहेत. सूत्रांच्या मते चंद्रकांत पाटील यांना पक्षामध्ये प्रतिस्पर्धी नको आहे. उदयनराजे भाजपवासी झाले तर ते चंद्रकांत पाटलांसाठी स्पर्धक ठरतील. त्यामुळेच राजेंना भाजपपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
व्हिडीओ पाहा
स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानं खालसा झाली. परंतु सातारचे संस्थान लोकशाही आल्यावरही या लोकशाहीच्या माध्यमातून कायम राहिलं. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कोणताही बदल झाला तरी साताऱ्याचे राजकारण म्हणजे इथलं राजघराणं हे समीकरण सत्तर वर्षांमध्ये कायम राहिलं आहे. मात्र या संस्थानाला राजकारणात टिकून राहण्यासाठी नेहमीच सत्तेचा आधार घ्यावा लागला आहे. आत्ताही उदयनराजे तोच आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यावेळी त्यांच्यासमोर आहेत ते मोदी आणि शाह आणि हेच उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त न लागण्याचं मुख्य कारण आहे.