गडचिरोली : महाराष्ट्राच्या दुर्गम टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा आजही विकासापासून कोसो दूर आहे. अहेरी या मुख्यालयाच्या शहरापासून केवळ 35 किमी अंतरावर व्यंकटापूर आहे. मात्र इथे पोहोचण्यासाठी तब्बल चार तास लागतात. रस्ता नाहीच, नदी-नाले-पूर ओलांडून आदिवासींच्या आरोग्यासाठी जेव्हा आरोग्य कर्मचारी-पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते गावात पोहोचले तेव्हा ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले.
गडचिरोली जिल्ह्यातील दुसरं प्रशासकीय मुख्यालय म्हणजे अहेरी. अहेरी तसं संपन्न गाव आहे. मात्र या गावापासून केवळ 35 किमी अंतरावर असलेल्या व्यंकटापूर गावात शेकडो आदिवासी नागरिक सध्या तापाच्या गोळीसाठी दिवसेंदिवस डॉक्टर अथवा परिचारिकेची वाट बघत असतात. ही स्थिती पावसाळ्यात अधिक बिकट असते. याच काळात रोगराईचं प्रमाण अधिक असतं.
व्यंकटापूर येथील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक पोलीस ठाण्याच्या जवानांनी आरोग्य शिबीराचं आयोजन करण्याचं नियोजन केलं. अहेरी येथून सकाळी निघालेला आरोग्य चमू 12 वाजता गावात पोहोचणं अपेक्षित होतं. पण दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे तब्ब्ल चार तास उशिरा आरोग्य चमू गावात पोहोचला.
संपूर्ण गाव चातकासारखी तज्ञ डॉक्टरांची प्रतीक्षा करत होतं. गावात पोहोचलेल्या चमूचं स्वागत करून थेट शिबीराचा प्रारंभ झाला. योग्य ती औषधे दिली गेली आणि काही वस्तूंचं मोफत वितरण देखील झालं. आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी हा अनुभव गडचिरोलीच्या दळणवळण व्यवस्थेचं विदारक वास्तव समोर आणणारा होता.
केवळ 35 किमीचे अंतर कापण्यासाठी चमूला चार तास लागले. या भागात ना रस्ते आहेत, ना पूल. पावलोपावली केवळ चिखल, नदी-नाले आणि पुराचे पाणी. चमूला आपले साहित्य आणि उपकरणे नेण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. औषधे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी स्थानिकांची मोलाची मदत झाली. ही झाली गोष्ट सामान्य नागरिकांची आहे. मात्र नक्षल धोका लक्षात घेता इथल्या पोलीस जवानांना मात्र याशिवाय आपल्यासोबत शस्त्र आणि चौकस दृष्टी देखील ठेवावी लागते.
पावसाळ्याच्या चार महिन्यात इथले नक्षलविरोधी अभियान राबवताना किती कष्ट उपसावे लागत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र व्यंकटापूर पोलीस, आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे शिबीर मोठ्या धाडसाने यशस्वी केलं.
व्यंकटापूरचे आरोग्य शिबीर केवळ शिबीर नव्हतं. तो व्यवस्थेची जाणीव करून देणारा अनुभव होता. आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी यातील संकटे पेलून तो अधिक समृद्ध केला हे विशेष. पण या गडचिरोलीतील दुर्गम भागांनाही मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे.
आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीही रस्ता नाही, गडचिरोलीतील विदारक वास्तव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2018 11:50 AM (IST)
रस्ता नाहीच, नदी-नाले-पूर ओलांडून आदिवासींच्या आरोग्यासाठी जेव्हा आरोग्य कर्मचारी-पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते गावात पोहोचले तेव्हा ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -