वर्धा : गोवर आणि रुबेला आजार नष्ट करण्यासाठी आजपासून सर्व शाळांमध्ये लस देण्याचे काम सुरू झाले आहे. यात वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयातील 10 व्या वर्गातील दोन तर आंजी येथील शाळेतील 1 अशा तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली आहे.

या तीन विद्यार्थिनींना लसीकरणानंतर एडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इमुनायजेशन (AEFI) दिसून आले. लसीकरणाच्या काही तासानंतर तिघींच्या शरीरावर पुरळ येऊ लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली आहे.

गोवर रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे
गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले

महाराष्ट्रात झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी  मोहिमेत सहभागी व्हा - आरोग्यमंत्री
आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले, केंद्र शासनाच्या साहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20 राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे  लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले.

राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवर चे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अशी आहे लसीकरण मोहीम

·       आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम
·       9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक
·       शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध
·       या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक.
·       पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
·       एक गोवर-रुबेला लस करते, दोन आजारांवर मात