मुंबई : आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलताना केला आहे.

माझ्यावर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असायला हवे. पण आज प्रशासनाकडे स्टाफ कमी आहे. आमच्यासारखा माणूस 3 महिने पत्रव्यवहार करत आहे. माझी ही स्थिती आहे. हे सरकार दुष्काळाचा पोरखेळ तर करत नाही ना? असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला.

तुमच्याकडे माणसंच नाहीत तर तुम्ही काय दुष्काळावर मात करणार, असा टोलाही त्यांनी लगावला आज माझ्या मतदार संघात 81 गावामध्ये पाणी मिळत नाही. याबाबत मी सभापतींना पत्र देणार आहे. मला आता पायऱ्यांवर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

पाण्याच्या समस्येबाबत मी कलेक्टर ऑफिसला बाब सांगितली, चंद्रकात पाटील यांना देखील याबाबत सांगितले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे जायचे कुठे? असा सवालही त्यांनी केला. ज्या ठिकाणी माझ्या मतदार संघात पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ येते तेव्हा जनावरांची काय स्थिती आहे याचा अंदाज लावा, अशा शब्दात खडसे यांनी संताप व्यक्त केला.

यापूर्वीही खडसे यांनी अनेकदा विधानसभेत आपल्याच सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे.