Bengaluru New Expressway : भारतातील सर्वात मोठं आयटी हब म्हणून ओळख असणारं बंगळुरु (Pune-Mumbai-Banglore) आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणारी मुंबई, या दोन शहरांत वारंवार ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आता मुंबई किंवा पुण्याहून बंगळुरुपर्यंतचं अंतर केवळ सात तासांत पार करता येणार आहे. मुंबई आणि पुण्याहून महामार्ग थेट बंगळुरुपर्यंत जोडला जाणार आहे. आयटी हब असणाऱ्या बंगळुरुला आणखी एक महामार्ग जोडला जाणार आहे. सध्या हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गासाठी अंदाजे 50,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच, हा महामार्ग तब्बल 699 किलोमीटर लांबीचा असणार असल्याची माहिती मिळत आहे. 


टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, प्रस्तावित मुंबई-पुणे-बंगळुरु एक्सप्रेस वेमुळे या तीन शहरांमधील प्रवासाचं अंतर 95 किलोमीटरनं कमी होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे पुण्या-मुंबईहून बंगळुरुला पोहोचायला केवळ सात तासांचा अवधी लागणार आहे. 


या महामार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तसेच, या महामार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. तसेच, हा महामार्ग बांधण्यासाठीचा अंतिम प्रस्ताव अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये NHAI समोर सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतरच या महामार्गाचं बांधकाम सुरु होणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, 2028 मध्ये एक्सप्रेसवे लोकांसाठी खुला होण्याची अपेक्षा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


12 जिल्ह्यांचा समावेश 


या प्रकल्पात 12 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.  त्यापैकी नऊ कर्नाटक आणि तीन महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. बंगळुरू ग्रामीण, बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर (बल्लारी), दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. 


पुणे रिंगरोडवरील कांजळे ते बंगळुरू महानगर क्षेत्रातील सॅटेलाइट रिंग रोडवरील मुथागडहल्ली येथून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे बंगळूरुचा प्रवास आता सोपा होणार आहे. तसेच या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये व्यावसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यातील बाबींचा विचार करुन मेरिडियनची रुंदी 15 मीटर असेल तर मार्गावर 55 उड्डाणपूल असतील. फक्त मुंबईतूनच नाही तर सातारा आणि कोल्हापूर व्यतिरिक्त गुजरात, नाशिक आणि पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठीही हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे. तसेच, हा प्रस्तावित महामार्गावरुन प्रवास करताना नीरा, येरळा, चांद नदी, अग्रणी, कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा, चिक्का हगरी आणि वेदवथ या 10 नद्या ओलांडून बंगळुरुपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करताना निसर्गरम्य प्रवास अनुभवता येणार आहे. 


12 जिल्ह्यांत रोजगाराची संधी


हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यातील स्थानिकांनादेखील या महामार्गाचा फायदा होणार आहे. तरुणांसाठीच नाही तर गावाची किंवा जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या वस्तुंनाही यामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. परंपरेनुसार चालत आलेले व्यावसाय अनेकांपर्यंत पोहचवण्यासाठी संधी यातील काही जिल्ह्यांना मिळाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आणि 12 जिल्ह्यातील स्थानिक नागरीकांना या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.