Aurangabad News: औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा (Heavy Rain) फटका फळबागेला देखील बसला आला. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी (Farmers) करतायत. मात्र असे असतांना अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान अशीच काही परिस्थिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क फळबाग पेटवून दिली आहे. 


सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला. तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी, केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं. विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच, परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही. मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली. यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत. 


कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ...


कृषीमंत्री अब्दुल सत्तार राज्यभरात दौरा करत नुकसानीची पाहणी करून आढावा घेत आहे. सोबतच पंचनामे करण्याचे आदेश देतांना या प्रकियेत एकही बाधित शेतकरी सुटणार नाही अशा सूचना देत आहेत. असे असताना मात्र कृषीमंत्री सत्तार यांच्या मतदारसंघातच अजूनही पंचनामे करणारे पथक बांधावर पोहचले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे खुद्द कृषीमंत्री यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात काय अवस्था असेल असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...


परतीच्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरीचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकरी दिवाळी सारखा सण देखील साजरी करू शकला नाही. त्यातच आता प्रशासनाकडून गोगलगायच्या वेगाने पंचनामे करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. तर पंचनामे वेळेवर न झाल्यास नुकसानभरपाई देखील मिळण्यास उशीर होईल. त्यामुळे खरीप तर गेले आता रब्बीची पेरणी कशी करावी यासाठी पैश्यांची जोडाजाडी करण्यात शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. 


Agriculture News : शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक