मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यासह त्यांच्या संबंधित लोकांवर ईडीकडून (ED) सकाळपासून सुरु असलेल्या कारवाईवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिक्रिया आली आहे. “सुजित पाटकर, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण, हे कुणाचे मुखवटे आहेत. कोणासाठी कंपन्या तयार करून हे गैरव्यवहार करत आहेत. मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकर यांच्या बिझनेस पार्टनर आहेत, असे नितेश राणे म्हणाले आहेत. 


पुढे बोलतांना नितेश राणे म्हणाले की, "अजुन किती शिवसैनिकांचा बळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटूंब घेणार आहे. स्वतः भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे. मग कारवाई होत असताना कधी रवींद्र वायकर, कधी सूरज चव्हाण नावं समोर येतात. पण कधीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगावे की आम्ही पैसे घेतले आमच्या नावाने पैसे फिरले होते, अशी टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. 


उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन शपथ घ्यावी..


ज्या प्रॉपर्टीवर जोगेश्वरीमध्ये फाईव्ह स्टार बांधत आहेत. त्यात आम्ही भागीदारी आहोत हे उद्धव ठाकरेंनी सांगावे. बाळासाहेब यांच्या खोलीत जाऊन शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी सांगावे की, रवींद्र वायकर, सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या व्यवहारात कुठलाही उद्धव ठाकरे कुटुंबाचा हात नाही. हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?,असेही राणे म्हणाले. 


उद्धव ठाकरेही दोषी...


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. जोगेश्वरी येथील खेळाच्या मैदानात हॉटेल बांधण्याच्या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल देखील दोषी असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.


राजकीय वातावरण तापले...


आमदार रवींद्र वायकर यांच्यावर आज सकाळी ईडीकडून झालेल्या कारवाईचे राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळत आहे. याच कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, वायकर समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वायकर यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना वायकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कर नाही त्याला डर कशाला? दूध का दूध पानी का पानी होईल, मुख्यमंत्र्यांचा रविंद्र वायकरांवर हल्लाबोल