रत्नागिरी : रत्नागिरीत नॅनो कार पुलावरुन कोरड्या नदीपात्रात पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना हा अपघात घडला.

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भागात रविवारी पहाटे हा अपघात घडला. नॅनो कार पुलावरुन कोरड्या नदी पात्रात पडल्यामुळे 42 वर्षीय पद्मा मांगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे 46 वर्षीय पती महेश मांगले गंभीर जखमी झाले.

महेश मांगले यांचा देवरुख येथे अगरबत्तीचा व्यवसाय आहे. मांगले दाम्पत्य कोल्हापूरहून अगरबत्ती खरेदी करुन देवरुखला जात होते. शनिवारी ते कोल्हापूरला गेले होते. रात्री 11.30 वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास साखरपा जाधववाडीत एका वळणावर त्यांची नॅनो कार मोरीवरील पुलावरुन खाली कोसळली.

महेश मांगले यांना उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आलं आहे. पद्मा मांगले या संगमेश्वर तालुक्यातील सायले प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.