मुंबई : उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे येत्या बुधवारी म्हणजेच 7 मार्चला उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं.

आता पुन्हा अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.