मोठी बातमी : अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, मविआच्या मागणीला मोठं यश
राज्याच्या पोलीस महासंचालक शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. लवकरच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
काँग्रेसचे रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आक्षेप
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.
निवडणूक आयोगाकडून बदली करण्याचा आदेश
नाना पटोले, काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची धूम चालू असताना दुसरीकडे निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे.
अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवण्याचा आदेश
विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आक्षेपांनंतर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी, असा आदेश दिला आहे. रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असेही निर्देश निवडणूक आयोगने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
रश्मी शुक्ला कोण आहेत?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक आहेत. याआधी त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. आता शुक्ला यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडे नेमका कोणता विभाग सोपवला जाणार तसेच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग करायचा होता- वडेट्टीवार
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते, हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता, असा सनसनाटी आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
Rashmi Shukla transfer Video News :
हेही वाचा :
Rashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक