Ranjitsinh Disale News : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असं असलं तरी त्यांच्याविरोधात कारनामा करण्याची एकही संधी शिक्षण विभागानं सोडलेली दिसत नाहीये. याबाबत आणखी एक कारनामा समोर आला आहे. डिसले यांना ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाला की नाही याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची टीम नियुक्त करून त्याची चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या चौकशी अहवालात रणजितसिंह डिसले यांनी पुरस्काराची तपशील दिले नाहीत म्हणून कारवाई करा असा अहवाल शिक्षण विभागाला दिला गेला होता. या संदर्भात परितेवाडीच्या शाळेवर जाऊन पाच सदस्यीय सदस्याने दोन तास डिसले यांची चौकशी केली होती.
परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले सरांसदर्भात मी स्वामींशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसीजर प्रमाणं अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियेप्रमाणं कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
चौकशी अहवालामध्ये काय म्हटलं होतं?
ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.
42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण
डिसले यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती मिळाली होती. प्रतिनियुक्तीच्या काळात डिसले हे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण या ठिकाणी कार्यरत नसल्याचा या चौकशी अहवालात ठपका आहे. प्रत्यक्षात एबीपी माझानं जेव्हा पडताळणी केली तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी या काळामध्ये सुमारे 42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा अहवाल स्वतः सोलापूरच्या शिक्षण विभागानं लिहिल्याचे दिसले आहे. याशिवाय रणजितसिंह यांच्या पहिल्या वर्षाचा प्रतिनियुक्तीचा जेव्हा मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा ते समाधानकारक असल्यामुळे पुन्हा दोन वर्षाचा मुदतवाढ देण्याचा निर्णय पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला त्याचाही पुरावा एबीपी माझाकडं डिसले यांनी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अकरा महिन्यापूर्वी सादर झालेल्या अहवालावर आता 25 जानेवारीला रणजित डिसले यांना मिळालेला फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी कागदपत्र दाखल करण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आल्यावर मगच ही कारवाई का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजी व्यथित
या सगळ्या प्रकारानं ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसून आलं होतं.
काय म्हणाले रणजितसिंह डिसले?
रणजितसिंह डिसले Abp Majha सोबत बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली. ते म्हणाले की, 25 जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत.14 डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही. फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे. राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला. या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही. झोपही लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले.
संबंधित बातम्या
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI