मुंबई : राज्य सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबईतील शाळादेखील देखील 24 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून  सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. 


धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता नववी ते 12 च्या 420 शाळा सुरू होणार आहे. नववी ते 12 च्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. शाळेचे कामकाज फक्त तीन तास चालणार असून  प्रत्येक शाळेत वैद्यकीय कक्ष बंधनकारक करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात सोमवारपासून शहरी भागातील आठवी ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी पर्यतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शाळा 24 जानेवारीपासून पहिली ते 12वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत.


वाशिम, अमरावतीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन एस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी, बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत. तर, पुण्यातील शाळांसंदर्भात अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही शाळांबाबत काही निर्णय झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत अजून जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढण्यात आलेलं नाही.


दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शाळांबाबत आज पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय अपेक्षित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी शाळा सुरू होणार नाही. सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती ची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मते सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत नाही आहे त्यामुळे आत्ताच यावर निर्णय घेता येणार नाही.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha