मुंबई : युनेस्को व लंडन येथील वारकी फाउंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांच्यावर आज विधानपरिषदेत अभिनंदनाचा वर्षाव झाला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी शिक्षक डिसले यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, डिसले गुरुजींचे प्रथम अभिनंदन करते. त्यांचे काम समाज्यात आदर्शवत व प्रेरणादायी आहे. तर डिसले गुरुजी यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी विनंती विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
परितेवाडी सारख्या गावात राहून डिसले गुरुजींनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये करत विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी वाढवली आहे. याचे श्रेय नक्कीच QR कोडचा सकारात्मक वापराला आहे. शालेय पुस्तकामध्ये याचा वापर केल्याने या नाविन्यपूर्ण प्रयोगाने विद्यार्थी शिक्षणात रुची घेऊ लागले आहेत. ही नक्कीच चांगली उपलब्धी आहे. तसेच ह्या पुरस्कारातील निम्मी रक्कम उर्वरित देशातील मुलांच्या शिक्षणासाठी देऊन दातृत्वाची पुढील पायरी जगाला दाखवून भारत मातेच्या संस्काराची ओळख सर्वांना दिल्याबाबतही डिसले यांचे अभिनंदन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्याची त्याचबरोबर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट देखील डिसले गुरुजींनी मधील काळात घेतली होती. त्यांनतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्यांच्या तब्येतीची काळजी उपसभापती कार्यालयाच्या वतीने घेतली जात आहे. आता त्यांची तब्येत सुधारत असून त्यांच्या आरोग्यास आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा त्यांनी व सर्व सभागृहाने दिल्या.
डिसले गुरुजी यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करावी : प्रवीण दरेकर
सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या सन्मानाने राज्याचेच नव्हे, तर देशाचा गौरव वाढवला आहे. शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी करुन जागतिक पुरस्कार मिळविलेले डिसले गुरुजी यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस करावी अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी येथील युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणाऱ्या ग्लोबल टिचर प्राईझ पुरस्कारासाठी डिसले गुरुजी यांची निवड करण्यात आली. याचा गौरव करण्यासाठी सभापतींनी आज विधानपरिषदेत डिसले गुरुजींचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देताना दरेकर यांनी सांगितले की, डिसले गुरुजी यांचा गौरव करण्यासाठी आपण स्वत: बार्शिला जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटंबियांचे अभिनंदन केलं. डिसेल यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनमोल कामगिरीमुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला कामाची खरी पावती मिळाली आहे. यामुळे अन्य शिक्षकांच्या कामाला व कतृत्वाला नक्कीच उभारी येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :
'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं दलाई लामा यांच्याकडून कौतुक!
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार : प्रवीण दरेकर
WEB EXCLUSIVE | कशी आहे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींची शाळा?