उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत बारामतीच्या सभेत घोषणा केली आहे. घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी उस्मानाबादमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील त्यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची नावं समोर आली होती. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र आज शरद पवार यांनी बारामतीच्या सभेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली तर माढामधून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

शिवसेनेनं आज लोकसभेसाठी 21 उमेदवारांची घोषणा केली. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये एकमेकांचे हडवैरी मानले जाणारे दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.

राणाजगजितसिंह पाटील हे सध्या कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत. आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. राणा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. पद्मसिंह पाटील यांच्यावर त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. ओमराजे हे पवनराजे यांचे सुपुत्र आहेत. सध्या या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यावर आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारूण पराभव केला. त्यानंतर ओमराजे यांनी लोकसभेसाठीची तयारी सुरु केली होती.

सुरुवातीला विद्यामान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील इतर नेत्यानी रवींद्र गायकवाड यांच्यावर नॉट रिचेबल असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन शिवसेने कडे एक तर काँग्रेसकडे दोन जागा आहे. शिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा सहकारी कारखान्याचा भंगार विकून कारखाना बंद पाडला असा त्यांचे विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. शिवाय शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सांवत आणि रवींद्र गायकवाड यांच्यात मोठ्याप्रमाणत गटबाजी आहे. त्यामुळे या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो.