रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील पक्ष कार्यालयात या धमकीचे पत्र पोस्टाने आले आहे.


ही धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आली असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी या धमकीविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, मु. पो. वडगांव तांदळी, जि. अहमदनगर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे या धमकी पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रामुळे तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे.

आमच्या साहेबांच्या नखालाही धक्का लागू देणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या पत्रातील व्यक्तीस शोधून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

सुनिल तटकरे हे राष्ट्रवादीचे मोठ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. आघाडी सरकारच्या काळात ते जलसंपदा मंत्री होते. सध्या रायगड लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यादरम्यान पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.