Vanchit Bahujan Aghadi : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Loksabha Constituency) वंचित बहुजन आघाडीकडून 'डबल' एबी फॉर्म जोडल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून वंचितकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपला नववा उमेदवार जाहीर केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच रामटेकचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांच्याऐवजी वंचितने शंकर चहांदे (Shankar Chahande) यांना पसंती देत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तर किशोर गजभिये हे आता अपक्ष म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.


शंकर चहांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब!


रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वंचीत बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारांना एबी फॅार्म देण्यात आले होते. यात शंकर चहांदे यांना 25 मार्च रोजी रात्री एबी फॉर्म मिळाला होता. तर किशोर गजभिये यांना 26 मार्चच्या सकाळी एबी फॉर्म देण्यात आला. मात्र चहांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज आधी दाखल केला होता. असे असताना वंचीत पक्षाकडून चहांदे आणि गजभिये अशा दोघांना एबी फॉर्म मिळाल्याने या ठिकाणी वंचितचा अधिकृत उमेदवार कोण, यावरून गोंधळ उडाला होता.


मात्र काल, 28 मार्चच्या रात्री पक्षाकडून शंकर चहांदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने रामटेकच्या उमेदवाराबाबत असलेल्या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजू पारवे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे श्याम बर्वे आणि वंचितकडून शंकर चहांदे अशी तिहेरी लढत होणार आहे. 


कोण आहेत चहांदे?


रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवार असलेले शंकर चहांदे हे भाजपकडून 1997 ते 2007 या काळात दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. यात त्यांनी जिल्हा परिषचे समाज कल्याण सभापति पद भूषविले होते. मात्र त्यानंतर 2007 मध्ये ते पराभूत झाले. तर त्यानंतर 2012 मध्ये त्यांच्या पत्नी कल्पना चहांदे या जिल्हा परिषदेत निवडून आल्या होत्या. चहांदे हे स्वतः 2015 मध्ये भाजपकडून कन्हान नगर परिषदेची निवडणूक लढले आणि त्यात ते विजयी झाले. दरम्यान, त्यांनी अडीच वर्षे कन्हानचे नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. असे असतांना यंदा त्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या