मुंबई: "महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आमचा अर्धवटराव पुन्हा चर्चेत आला. मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अर्धवटरावाबद्दल 1968 मध्ये जाहीर वक्तव्य केलं होतं", अशी आठवण बोलक्या बाहुल्यांचे शिल्पकार रामदास पाध्ये यांनी सांगितली.

होळीच्या निमित्ताने शब्दभ्रमकरार रामदास पाध्ये, त्यांची पत्नी अपर्णा आणि मुलगा सत्यजीत यांनी 'माझा कट्टा'वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

माझे बाबाही बोलक्या बाहुल्यांचे खेळ करायचे. आधी एका मुखवट्याला चक्रम हे नाव होतं. मग इंग्रजीत शो करताना त्याचं मिस्टर क्रेझी हे नाव झालं. पुढे एक मोठा बाहुला तयार केला, त्याला काय नाव द्यायचं हा प्रश्न होता. चक्रम- मिस्टर क्रेझी यातून अर्धवट हे नाव ठरलं आणि त्यातूनच अर्धवट हा अर्धवटराव झाला, अशी जन्मकहाणीही रामदास पाध्ये यांनी सांगितली. 

यावेळी पाध्ये यांनी गाजलेल्या अर्धवटराव आणि सत्यजीतने बंडू या बोलक्या बाहुल्यांचे काही विनोद सादर केले.

महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेचा पारदर्शी मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी अहवाल अर्धवट वाचला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मग त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हा अहवाल केंद्राचा आहे, केंद्र सरकार खोटं बोलतंय का अर्धवटराव? असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

तोच धागा पकडून पाध्ये यांच्या अर्धवटरावाने, अर्धवटराव म्हणून माझी बदनामी किती करायची? असा प्रश्न विचारुन हास्यकल्लोळ उडवून दिला.

याशिवाय बाळासाहेबांनी जाहीर सभेत आमच्या बोलक्या बाहुल्यांचा उल्लेख केला होता. 1968 च्या दरम्यान, बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना गुंगी गुडिया संबोधलं होतं. इंदिरा गांधी स्वत: न बोलता, न निर्णय घेता दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन बोलत असल्याचा दाखला देत, या गुंगी गुडिया म्हणजेच आपल्या रामदास पाध्ये करत असल्याचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ आहे, असं बाळासाहेब म्हणाले होते, अशी आठवण पाध्येंनी सांगितली.

अर्धवटराव शंभर वर्षाचा

अर्धवटराव हे गाजलेलं पात्र आता शंभर वर्षांचं झालं आहे. माझ्या वडिलांनी बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरु केला होता. त्यावेळी अर्धवटरावची निर्मिती झाली, असं रामदास पाध्ये म्हणाले.

अर्धवटराव जर शंभर वर्षाचा झाला,


तर मग तुमचं वय किती, असं लोक विचारतात,


असंही पाध्येंनी नमूद केलं.


अर्धवटराव- आवडाबाई माझ्याशी बोलले पाहिजेत हा माझा हट्ट होता, त्यातूनच वडिलांनी मला रियाज करायला सांगितला. त्यातूनच ही कला मला अवगत झाली, असं रामदास पाध्ये म्हणाले.

केवळ शब्दभ्रमंती नको, सर्व बाहुल्यांचा अभ्यास कर, कलेबरोबर शिक्षणही हवं, त्याचं प्रतिबिंब कलेत यावं ही वडिलांची शिकवण होती. त्यानुसार माझा पहिला कार्यक्रम 1 मे 1967 ला झाला. तेव्हापासून विविध अनुभव घेत आहे, असं रामदास पाध्ये म्हणाले.

बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्यासाठी विविध ठिकाणी गेलो. परदेशातही खेळ झाले. त्यानंतर मला देशात प्रसिद्धी मिळाली, असं पाध्येंनी सांगितलं.

कोकणाने अमेरिका वारी घडवली

"1972 मध्ये मला बोलक्या बाहुल्यांच्या शोसाठी अमेरिकेतून निमंत्रण आलं होतं. त्यावेळी अमेरिकेत जाण्यासाठी तिकीट दर 4 हजार रुपये होता. त्यावेळी मी आणि भावाचे 8 हजार रुपये उभे करणे अशक्य होतं. मात्र आम्ही कोकणात बोलक्या बाहुल्यांचे खेळ करुन 8 हजार रुपये उभे केले. कोकणाने माझी अमेरिका वारी घडवली", असं रामदासे पाध्ये म्हणाले.

"अमेरिकेला जाण्यासाठी कोकणात कार्यक्रमात केले, कोकणाने मला 8 हजार रुपये मिळवून दिले"

परदेशातून परतल्यानंतर मी इंजिनिअरिंग नव्हे तर पूर्णत: व्यावसायिकपणे बोलक्या बाहुल्यांची कला सादर करण्याचं ठरवलं. दूरदर्शन सुरु झाल्यानंतर चारच दिवसात 'मेरी भी सुनो' हा माझा कार्यक्रम सुरु झाला, अशी आठवण रामदास पाध्ये यांनी सांगितली.

घरी 2 हजार बाहुल्या

आमच्या घरी 2 हजाराहून अधिक बाहुल्या आहेत.  तीच- तीच पात्र घेतल्यामुळे  नाविन्य राहात नव्हतं, म्हणून नव-नव्या बाहुल्या घेतल्या, असं पाध्ये म्हणाले.

त्यातूनच सरदार गडबडसिंह हा मी स्वत: बनवलेला बाहुला होता. एकाचवेळी तीन-तीन बाहुले ऑपरेट करत होतो, त्याकाळी लोकांना त्याचं खूपच अप्रूप होतं.

लिज्जत पापडची जाहिरात

लिज्जत पापडच्या जाहिरातीसाठी ससा निवडला, तो ससा आता 38 वर्षांचा झाला (ती जाहिरात करुन 38 वर्ष झाले), तो सर्वाधिक जगलेला ससा आहे. या जाहिरातीसाठी मी खूप कष्ट घेतले. ती मालकांनाही आवडली, असंही पाध्येंनी नमूद केलं.

विक्रम गोखलेंकडून कौतुक

नटापेक्षा तुझं काम आव्हानात्मक आहे, असं विक्रम गोखले म्हणाले होते. नटाला दुसऱ्या नटाच्या प्रतिक्रेयवरुन अभिनय करायचा असतो. मात्र इथे तर तू बाहुल्याला बघून स्वत: अभिनय करतोस, हे आव्हानात्मक आहे, असं गोखले म्हणाल्याचं पाध्येंनी सांगितलं.

बोलक्या बाहुल्यांच्या शोमध्ये पत्नीमुळे संगीत आल्याचं त्यांनी सांगितलं.

लग्नात लोक आम्हाला भेटण्याऐवजी अर्धवटराव, आवडाबाईंना भेटत होते, असं अपर्णा पाध्ये यांनी सांगितलं.

तर काळानुसार बोलक्या बाहुल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं सत्यजीत पाध्ये म्हणाला.

अर्धवटराव शंभरी पूर्ण करतोय, त्यानिमित्ताने देश-विदेशात 100 शो करायचे आहेत, अशी इच्छा रामदास पाध्ये यांनी व्यक्त केली.

VIDEO: