मुंबई : औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना चांगलाच भोवला आहे. कारण, रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.


रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 15 जानेवारीला औरंगाबादेत रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी केली होती. हा वाद थेट ‘मातोश्री’वर धडकल्यानंतर रामदास कदमांकडून औरंगाबादचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं.

दरम्यान,  पालकमंत्र्यांच्या बदल्यांसंबंधी सामान्य प्रशासन विभागाकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार रामदास कदम यांची नांदेड पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. दीपक सावंत यांची औरंगाबाद आणि गुलाबराव पाटील यांची परभणीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुंदोपसुंदी सुरुच आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना आधी समजही दिली होती. मात्र, 15 जानेवारीला औरंगाबादमध्ये बोलताना रामदास कदमांनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंवर शेरेबाजी केली.

खैरे यांनी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामकरणाचा विषय लावून धरला आहे. नामांतराचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने उपस्थित केला होता. पण याप्रकरणी शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप खैरेंनी केला होता. याचबाबत बोलताना रामदास कदम यांनी खैरेंना फटकारलं होतं.

‘खैरे खासदार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे की नाही ते पाहावं. गरज पडली तर वेलमध्ये बसावं. पण साप-साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार थांबवावा.’ अशी शेरेबाजी कदमांनी केली होती.

या सर्व प्रकारानंतर 'मातोश्री'च्या आदेशावरुन रामदास कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरुन अखेर आज उचलबांगडी करण्यात आली.