मुंबई : येत्या काही दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या काळात राज्यात खूप मोठी उलथापालथ झाली होती. निवडणुकीआधी आणि निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक मोठे राजकीय भूकंप झाले होते. आता राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, असे भाकित आठवले यांनी व्यक्त केले आहे. आठवले यांच्या या वक्तव्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात दोन महिने भूकंपाचे आहेत. सुरावातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भूकंप झाला. आता कोणाचा भूकंप होणार? हे आपण पाहू, मात्र एखादा भूकंप होण्याची शक्यता आहे.


आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला आहे. सत्ताधाऱ्यांना त्यातही प्रामुख्याने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा आधार घेतला आहे. त्यावरुन भाजपकडून कालपासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.


राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. आधी दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करण्यासाठी 23 हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.


काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी, महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेवर हल्ला चढवला होता. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती सरकार आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.





हे सरकार सहा महिनेसुद्धा चालणार नाही : रामदास आठवले