पुणे : सध्या देशात सावरकरांच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ माजला आहे. परंतु हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे, असे मत काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी मांडले. दलवाई काल (14 डिसेंबर) एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.


हुसेन दलवाई म्हणाले, देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. अनेक तरुणांचे रोजगार बुडाले आहेत. या कंपन्या कशा सुरु होतील? तरुणांना रोजगार कसा मिळेल? याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल? हे स्वप्न जनतेला दाखवणे आणि ते स्वप्न पूर्ण करुन घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.


महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. या महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. हे सरकार पडावे म्हणून कोणी देव पाण्यात बुडवून बसले असतील तर त्यांची निराशा होईल. कारण हे सरकार पाच वर्षे निर्धोकपणे चालेल.


दलवाई म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात कितीही मतभेद असले तरी ते एकमेकांशी जुळवून घेतील. भाजप आणि शिवसेनेइतके आमचे संबध टोकाचे नाहीत. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी असल्याने मतभेद हे होणारच. आमच्या सरकारचे नावच महाराष्ट्र विकास आघाडी आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच आमचे सरकार झाले आहे.