Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. भाजपने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेतल्याने रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहण्यासाठी नऊ तास महाराष्ट्राला वेठीला धरलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरुन शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  


15 सेकंदाचा व्हिडीओ पाहण्यासाठी नऊ तास? : जितेंद्र आव्हाड
यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "दुर्दैवाने लोकशाहीचा खेळखंडोबा या देशात सुरु झालेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीती व्यक्त केली होती ती आता काही अंशी खरी ठरायला लागली आहे. निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा असतो. लोकशाहीची पिळवणूक, लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही आमचा मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर निष्कारण महाराष्ट्राला नऊ तास वेठीला धरुन ठेवणं कशाचं द्योतक आहे? एक एक लाख लोक रात्रीचे टीव्ही पाहत होते. याचा अर्थ महाराष्ट्र पाहत होता काय चाललंय ते. महाराष्ट्राला आता कळलं असेल नेमकं काय चाललं आहे. माझा असेल कोणाचाही असेल 15 सेकंदांचा व्हिडीओ होता, त्यावर एक सेकंद नव्हता. तो व्हिडीओ पाहण्यासाठी नऊ तास? ज्यांनी लोकशाहीवर मनापासून प्रेम केलं, लोकशाही मूल्यांची जपणूक केली, त्यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना काय सांगितलं होतं याची आठवण येईल.


अन् नऊ तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली
राज्यसभा निवडणुकीसाठी काल 10 जून रोजी मतदान झालं. सकाळी 9 ते 4 अशी मतदानाची वेळ होती. त्यानंतर मतमोजणी सुरु होऊन सात वाजता निकाल लागणं अपेक्षित होतं. पण जवळपास नऊ तासांनंतर मतमोजणी सुरु झाली. महाविकास आघाडीमधील जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. दिल्लीच्या निरीक्षकांनी याचा अहवाल मागवला होता. हा अहवाल येईपर्यंत मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. अखेर रात्री उशिरा निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं आणि रात्री एक वाजता मतमोजणी सुरु होऊन निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला.


राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी
राज्यसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या तीन आणि भाजपच्या तीन उमेदवारांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 39 मतं मिळाली, परिणामी 41 मतं मिळवलेल्या भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या