Dhananjay Mahadik : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रात गेल्या तीन वर्षांपासून पराभवाचे दणके सहन करत असलेल्या महाडिक कुटुंबाने अखेर विजयश्री खेचून आणली आहे. राज्यसभेसाठी (Rajya Sabha election result) सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. धनंजय महाडिक यांना 41.56 मते मिळाली. या विजयाने महाडिक कुटुंबातील विजयाचा दुष्काळ संपला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक गटाला चांगलीच उर्जितावस्था या विजयाने प्राप्त झाली आहे. 
 
विजयी झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी संपूर्ण विजयाचे श्रेय भाजप आण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, या विजयाचे फक्त आणि फक्त शिल्पकार कोण असतील ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची संपूर्ण टीम आहे, यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा, अशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड, दरेकर यांनी कठोर परिश्रम घेतले. त्याचा आपल्याला परिचय या निवडणुकीमध्ये दिसत आहे. 



ते पुढे म्हणाले की, आमच्यासाठी निवडणूक खूपच मोठी आहे, ज्या दिवशी मी अर्ज भरला त्यावेळी सुद्धा मी म्हणालो होतो फडणवीस यांनी संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय तिसरा उमेदवार जाहीर केला नसता. आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही सांगितले होते भाजपचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीकडून अनेकवेळा संख्याबळ सांगण्यात आले, त्यामुळे चारही उमेदवार निवडून यायला हवे होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली त्यामुळे भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असून हा ऐतिहासिक विजय आहे.


ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची होती असे नमूद करत त्यांनी संजय पवार यांच्या पराभवावर कोणतेही भाष्य केलं नाही. ते आपले मित्र असल्याचे ते म्हणाले. 2014 ते 19 लोकसभेमध्ये काम केलं आहे. मला लोकसभेचा पूर्वानुभव आहे. मी चांगलं काम केल्याने तीनवेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. म्हणून आता इथून पुढं भाजपच्यावतीने महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या काही प्रश्न समस्या अडीअडचणी असतील त्या राज्यसभेमध्ये प्रभावीपणे मांडणं, त्यांच्यासाठी चांगले कायदे बनवण्यात यासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी काम करू असे मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो, असेही महाडिक म्हणाले. 


महाडिकांना संजय राऊतांपेक्षा जास्त मते 


यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या विजयानंतर पाहायला मिळाला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊत पेक्षाही जास्त मता घेतलेली आहेत. आमचे माननीय पियुष गोयल 48 मते घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले. तेवढीच मते डॉक्टर बोंडे यांना मिळाली. त्यानंतर आमचे धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. शिवसेनेचे ऑफिशियल कॅंडिडेट संजय राऊत यांच्या पेक्षा ही मते जास्त आहेत.