कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ संबंधीची कंपनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यावरुन राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष 'महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तर, खोत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मागील काही दिवसात कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह नितीन सरदेसाई यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आता कडकनाथ घोटाळ्याची चौकशी ईडी करावी ही मागणी करण्यासाठी राजू शेट्टी स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले.
रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका
सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली आहे. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप आहे. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यात रक्कम घेतली जाते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस, भांडी दिली जातात.
तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते. 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते. यातून शेतकर्याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक
वाळवा तालुक्यातील कापूरवाडी येथील संतोष कदम यांनी 600 कडकनाथ कोंबड्याचे शेड उभारले आहे. 7 लाख 20 हजार रुपये या व्यवसयात गुंतवले, मात्र आता तो अडचणीत आला आहे. दीड महिन्यात 75 हजार खाद्यावर खर्च केले आहेत. हजारो अंडी घरात पडून आहेत. कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी आता हाती पैसा नसल्याने झाडाची पाने या कडकनाथ कोंबड्यांना घालण्याची वेळ संतोषवर आली आहे. बायकोच्या बचतगटावर कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून संतोषने हा व्यवसाय वाढवला, मात्र आज हा व्यवसायच अडचणीत आल्याने या संतोषवर संकट ओढवलं आहे. संतोष सारखीच स्थिती अनेकांची आहे.
संबंधित बातम्या
'कडकनाथ’ कुक्कुटपालनात शेतकऱ्यांची फसवणूक, जवळपास 500 कोटी अडकले
आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर, गरज पडल्यासच पुन्हा बोलावणार