Raju Shetti News : कोल्हापूर व सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3 हजार 751 रुपयांची पहिली उचल मिळवून देवू यासाठी आंदोलनाची तीव्रता अजून वाढवण्याची आर्त हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. आज गुरलापूर जिल्हा बेळगांव येथे झालेल्या ऊस आंदोलनात राजू शेट्टी बोलत होते. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रापेक्षाही कर्नाटक सीमाभागात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. यामुळे चालू वर्षी गळीत हंगामात पहिली उचल 3 हजार 751 रुपये व गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला 200 रूपये दुसरा हप्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी गुरलापूर जि. बेळगांव येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान केला आहे.
साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारी व रिकव्हरी चोरी करतायेत
कोल्हापूर , सांगली व कर्नाटक सीमाभागातील साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारी व रिकव्हरी चोरी करत आहेत. सर्व कारखानदार एक होवून कोल्हापुर जिल्ह्यासाठी 3400 रूपये व कर्नाटक राज्यातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील कारखाने 3 हजार रूपये पहिली उचल देण्यावर ठाम राहिले आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतक-यांनी अभूतपुर्व एकी केली असून साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून धरली आहे.
प्रतिटन 3751 रूपयाची पहिली उचलची मागणी योग्य
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार कर्नाटकातील 80 ते 90 किलोमीटर अंतरावरून ऊस आणण्याचा प्रयत्न करत असून 90 किलोमीटर वरून येणा-या ऊसाला 3400 रूपये दर देण्याची घोषणा जवाहर साखर कारखान्यांने केली आहे. यामुळे साखर कारखान्यास प्रतिटन जवळपास 1100 रूपये तोडणी वाहतूकीचा दर पडणार आहे. यामुळे स्वाभिमानीने प्रतिटन 3751 रूपयाची पहिली उचलची मागणी योग्य असल्याचे यावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
कारखानदार जाहीर करत असलेला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही
कारखानदार जाहीर करत असलेला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही. तर उसाला 3 हजार 751 रुपयांचा दर द्यावा. सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाने कारखानदार आणि संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. सोमवारी ही बैठक न झाल्यास बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे उसाचा बुडखा देऊन स्वागत करु असा इशाराच या वेळेस राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: