Rajeev Satav :  दिवंगत खासदार राजीव सातव हे केंद्रात काँग्रेसचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जायचे. गांधी परिवाराशी असलेली त्यांची जवळीक सर्वांना परिचीत होतीच. पक्षाच्या संदर्भात राज्यातील अनेक महत्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं अन् काँग्रेस पक्षाला मोठा धक्काच बसला. मात्र एका वर्षानंतर पहिल्या पुण्यस्मरणादिवशी काँग्रेस पक्ष राजीव सातव यांना विसरला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


राजीव सातव यांना काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाऊ मानले होते. परंतु राजीव सातव यांच्या निधनानंतर एकाच वर्षात वर्षा गायकवाड आणि प्रज्ञा सातव यांच्यातील कलह समोर आला आहे.
 
राजीव सातव यांचे निधन होऊन काल एक वर्ष पूर्ण झाले. प्रथम पुण्यस्मरणादिवशी वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राजीव सातव यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार होते. परंतु वर्षा गायकवाड यांच्या आगमनाच्या अगोदरच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 


काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. परंतु काल वर्षा गायकवाड यांचा अपवाद वगळता एकही काँग्रेसचा मंत्री या कार्यक्रमाला हजर झाला नाही. राजीव सातव यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात वर्षा गायकवाड यांनी उपस्थिती लावली खरी परंतु गायकवाड यांनी प्रज्ञा सातव यांची भेट घेणे सुद्धा महत्त्वाचे समजले नाही. पुतळ्याला हार घालून पूजा केली आणि कार्यक्रम स्थळाहून त्यांनी काढता पाय घेतला.


राजीव सातव यांच्या निधनानंतर एका वर्षात प्रज्ञा सातव आणि वर्षा गायकवाड यांच्यात कलह सुरू असल्याचे दिसून आल्याचं बोललं जात आहे. वर्षा गायकवाड यांनी मला भेटायला पाहिजे होते, राजीव सातव यांच्या विषयी बोलायला पाहिजे होते, असं मत प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केली तर वर्षा गायकवाड यांना विचारले असता आता या विषयावर आता राजकारण नको असे बोलून या विषयावर त्यांनी बोलणे टाळले.  


वर्षा गायकवाड यांनी राजीव सातव यांच्या पुतळ्यासाठी 10 लाख रुपये देऊन पुतळ्याची निर्मिती केली, परंतु प्रज्ञा सातव यांनी गायकवाड कळमनुरीत दाखल होण्याअगोदर पुतळ्याचे अनावरण करून घेतले. त्यामुळे प्रज्ञा सातव आणि वर्षा गायकवाड यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.  असं असलं तरी जोधपूर येथील पक्षाचा कार्यक्रम आटोपून वर्षा गायकवाड कळमनुरीमध्ये कार्यक्रमात दाखल तरी झाल्या परंतु इतर मंत्र्यांनी किंवा मोठ्या नेत्यांनी तेही कष्ट घेतले नाही.