मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज्यातील निवडणुका कधी याचा आज फैसला
राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणारं आहेत याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. कोर्टानं याबाबात सुनावणीसाठी दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर निवडणुका पावसाळ्यानंतर होणार की त्याच्या आधी घेण्यात येणार याबाबतस्पष्टता येणार आहे.
ओबीसी आरक्षणामुळे स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकीची प्रक्रिया ही चार आठवड्यात जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यावर राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात विनंती केली होती. आता निवडणूक आयोगाची ही मागणी मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे.
मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची डेडलाईन जारी
पावसाळा तोंडावर आला असतांना मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नालेसफाईची डेडलाईन नव्यानं जाहीर केली आहे. येत्या 25 तारखेपर्यंत मुंबईतली मान्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण होईल अशी प्रशासनाला खात्री आहे. मुंबईत सध्या पश्चिम उपनगरांत 68 टक्के, पूर्व उपनगरात 62, शहर भागात 40 टक्के, मिठी नदीची 89 टक्के आणि छोटे नाले 74 टक्के नालेसफाई झाली आहे.
एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओ आज स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच शेअर बाजारात एलआयसीच्या आयपीओपासून श्रीगणेशा केलाय. एलआयसीच्या आयपीओला तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले. मात्र, एलआयसीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सवलतीच्या दरात व्यवहार करतायत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोन युध्दनौका नौदलाच्या ताफ्यात
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज दोन युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. माझगाव डॉक परिसरात होणाऱ्या कार्यक्रमातून 'ब्लू वॉर नेव्ही' म्हणून ओळख असलेल्या भारतीय नौदलाचं सागरी सामर्थ आणखीन वाढणार आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर होणार
14 मेपासून सुरू असलेले ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाचे काम संपले आहे. आज, 17 मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पक्षांकडून सर्व प्रकारचे मोठे दावे केले जात आहेत. ज्यामध्ये हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, मशिदीत सर्वेक्षण करताना 12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले आहे. ज्यानंतर हिंदू पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे. आता शिवलिंग मिळण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते ठिकाण तात्काळ सील करावे, तसेच त्या ठिकाणी कोणाच्याही प्रवेशावर बंदी घालण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले. दुसरीकडे, न्यायालयात अहवाल सादर होईपर्यंत मशिदीतील वाजुखानाचे जतन करण्याची तयारी हिंदू पक्षाने केली आहे.
मुंबई वॉर्ड रचनेसंबंधी काँग्रेसची बैठक
मुंबईतील नवीन वार्ड पुर्नरचना ही शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांचा आहे. त्यावरून शिवसेनेवर काँग्रेसची नाराजी आहे. संपूर्ण मुंबईत जवळपास 45-50 वॉर्डमध्ये शिवसेनाला फायदा होईल अशाप्रकारे बदल केले आहेत अशी राजकीय वर्तृळात चर्चा आहे. यांपैकी 17 ते 18 वॉर्डमधील बदलांचा थेट फटका काँग्रेसला बसेल अशी स्थिती आहे. यासंबंधी आज मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची पक्षांतर्गत बैठक होणार आहे.
मनसे नेते संदिप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी
मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका स्वीकारल्यानंतर शिवतीर्थाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई पोलिसांशी झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतष धुरी या दोघांनीही मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी निश्चित होणार आहे. हे दोघेही घटनेच्या दिवसापासून फरार आहेत.
भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी
भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एका मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रं तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे तूर्तास अटकेपासून कोणतंही संरक्षण नाही.