Rajan Salvi Family Gets Anti Corruption Bureau Notice : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच, त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं.  


गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. आतापर्यंत तीन वेळा राजन साळवी अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असा प्रश्न राजन साळवींनी उपस्थित केला आहे. 


राजन साळवी म्हणाले की, "आजच सकाळी माझी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी यांना एसीबीची नोटीस आली आहे. 20 मार्चला त्यांना अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. मी यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे की, सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे. राजन साळवी काय आहे, हे माझ्य मतदारसंघाला माहीत आहे. नोटीस आल्यावरच मी जाहीर केलं होतं की, मी याप्रकरणात संपूर्ण सहकार्य करेल आणि तसं करतोय."


"उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार आहेत. त्यांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांची नावं संग्रही आहेत. पण त्यांना कोणत्याही नोटीसा दिल्या जात नाहीत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी. याचा आम्ही निषेध करतोय.", असं राजन साळवी म्हणाले. तसेच केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही राजन साळवी यांनी केला आहे. कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही साळवींनी म्हटलंय. 


पाहा व्हिडीओ : Rajan Salvi Family ACB Notice : मोजमाप, पाहणी आणि चौकशीनंतर राजन साळवींच्या कुटूंबियांनाही ACBची नोटीस



राजन साळवींच्या अडचणींत वाढ 


राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. आज लाचलुचपत विभागानं राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. 


राजन साळवींचं घर, हॉटेलचं एसीबीकडून मुल्यांकन 


राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत सध्या एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीनं राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता.