Weather Forecast Today : देशातील हवामानामध्ये सध्या मोठा बदल झाल्याचं चित्र आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी उन्हाचा पारा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत देशातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक भागांत 20 मार्चपर्यंत तुरळक पावसाच्या सरी तर काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे अनेक भागांत पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.
पुढील पाच दिवस पावसाची शक्यता
आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 16 ते 20 मार्च या काळात पूर्व भारत, वायव्य भारतासह पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस, ढगांचा गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील 10 दिवसांत मध्य, उत्तर आणि पश्चिम भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान होऊन उत्पादनांवरदेखील परिणाम होईल.
'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत विविध भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पर्वतीय प्रदेशासह अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
डोंगराळ भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस
तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये 16 ते 19 मार्च दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांमध्ये पावसासह जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 17 ते 19 मार्च दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाची शेतीला फटका
हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दुपारी कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. अनेक राज्यांमध्ये हाती आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या शेतीपिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस किंवा गारपीट झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :