Yavatmal News : नुकतीच बदलापूरमध्ये (Badlapur Crime) जी काही एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना झाली, ही घटना खऱ्या अर्थाने आमच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे आणली. तेव्हा ती घटना सर्वांपुढे आली असून तोपर्यंत ही घटना दाबूनच ठेवली होती. या घटने पाठोपाठ राज्यात इतरही अनेक ठिकाणी असेच प्रकार घडत असल्याचे आता पुढे येऊ लागले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात लहान लहान मुलींवर बलात्काराच्या घटना होत आहेत. अशा वेळी वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी (Chhatrapati Shivaji Maharaj) महाशक्ती आज खऱ्या अर्थाने हवी होती. महाराजांनी रांझ्याच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच या नराधमांचे केलं पाहिजे. असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. यवतमाळच्या वणी येथे आयोजित एका सभेमध्ये ते बोलत होते. 


एकदा सत्ता देऊन बघा, राज्य कसं हाताळलं जातं हे मी दाखवतो- राज ठाकरे  


राज्यात राजरोस अशा घटना घडत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे राज्यात कायद्याचा वचक उरलेला नाही. या सर्व प्रकरणात पोलिसांचा अजिबात दोष नाही. त्यांच्यावर जो वरच्या राज्यकर्त्यांचा दबाव असतो, त्या दबावामुळे त्यांना तसं वागावं लागतं. कारण पोलिसांनी कुठल्या गोष्टी करायला घेतल्या तर पोलिसांचं निलंबन होतं. पोलिसांमागे चौकशा आणि निलंबनाच्या कारवाई केली जाते. मात्र जे लोक सत्तेत बसले आहे त्यांच्या कधीही चौकशी केली जात नाही. कुठली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांच्या हातात आज काहीही नाही. मात्र दोष द्यायची वेळ आलीच तर त्यांना जबाबदार धरलं जातं.


अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे हे सहज बोलतात. मात्र,  मी सहज कुठलीही गोष्ट बोलत नाही. आपण एकदा या राज ठाकरेच्या हातात या राज्याची सत्ता देऊन बघा. राज्य कसं हाताळलं जातं हे मी तुम्हाला दाखवून देईल, कायद्याची भीती काय असते,  हे मी तुम्हाला दाखवून देईल आणि परत महिलांकडे बघण्याची कुणाची वक्रदृष्टी होणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केलाय.


चौंरग शिक्षा म्हणजे काय?


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन केलं जायचं. यांचे अनेक उदाहरण शिवरायांनी घालून देत आपल्या मावळ्यांनाही तशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळेच आजही छत्रपती शिवरायांच्या, पराक्रमी मराठ्यांच्या इतिहासात पुन्हा पुन्हा डोकावून पाहावं लागतंय आणि उर अभिमानाने भरून येतो. मात्र, अशीच एक घटना शिवकाळात देखील घडली होती. यात रांझे गावच्या भिकाजी बाबाजी ऊर्फ गुजर पाटलाने एका महिलेसोबत गैरकृत्य केल्याच प्रकरण शिवरायांपुढे आले होतं. यावर छत्रपती शिवराय नेमकी काय शिक्षा देणार याकडे साऱ्या रयतेसह उपस्थित मंत्रीमंडळाचेही लक्ष लागले होते. त्यावर शिवरायांनी कधी नव्हे ती शिक्षा सुनावली आणि ती शिक्षा म्हणजे चौरंग शिक्षा. चौरंग शिक्षा म्हणजे आरोपीचे दोन्ही हात आणि पाय कलम करणे. या शिक्षेच्या अमलबजावणीनंतर शिवकाळात परत असे कृत्य कुणी केल्याचे उदाहरण नाही. याच शिक्षेचा दाखला देत आज राज ठाकरेंनी बदलापूरच्या आरोपीला या शिक्षेसंदर्भात मागणी केली आहे.   


हे ही वाचा