Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सर्व्हे दाखवून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. आता हाच पॅटर्न भाजपच्या विद्यमान आमदारांवर सुद्धा येण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) भाजपकडून सुद्धा आता अंतर्गत तयारी सुरू करण्यात आली आहे. आता यामध्ये संघ सुद्धा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमानदारांना सर्व्हेला तोंड द्यावं लागणार आहे. 


भाजप आणि संघाचा सर्व्हे भाजपच्या विद्यमान आमदारांचे भविष्य ठरवणार


भाजप आणि संघाचा सर्व्हे भाजपच्या विद्यमान आमदारांचे भविष्य ठरवणार आहेत. त्यामुळे सर्व्हेची टांगती तलवार आमदारांवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाकडून आणखी दोन सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानंतरच विद्यमान आमदारांमध्ये कोणाला उमदेवारी द्यायची आणि कोणाचा पत्ता कट करायचा यावर निर्णय होणार आहे.  त्यामुळे विद्यमान आमदारांमध्ये आता सर्व्हेची धास्ती लागून राहिली आहे. 


उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार


यापूर्वी सुद्धा भाजपकडून एक उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. मात्र, या सर्वेक्षणामध्ये बहुतांश आमदारांची कामगिरी असमाधानकारक होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि संघांकडून उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सातत्याने सर्व्हेचा दाखला देऊन अधिकाधिक जागा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला होता. 


गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून माहोल करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी जागा वाटपावरून मात्र अजूनही या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. भाजप किती जागा लढवणार, अजित पवार गटाला किती जागा मिळणार आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार? यावर सुद्धा बरीच गणिते अवलंबून असणार आहेत.


जागावाटपामध्ये समाधानकारक जागा वाट्याला न आल्यास या तिन्ही पक्षांमध्ये बंडखोरी अटळ आहे. कोल्हापूरमध्ये कागलमधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपचे समरजित घाटगे तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या