महाराष्ट्र नवनिर्माण सेना... 2006 साली राज ठाकरे यांनी उचललेलं हे पाऊल अनेकांना आश्चर्यचकित करणारं होतं. साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि त्यांच्या पक्षाची राज्यात मजबूत पकड असतानाही त्यांच्या समोर जनतेसाठी मनसे नावाचा पर्याय उभं करणं हे अर्थात सोपं नव्हतं.


ठाकरे घराण्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी उपजत कला असते. तशीच कला राज ठाकरे यांच्या अंगीसुद्धा होती. आपल्या वाडिलांसारखं आणि काकांसारखं ते उत्तम व्यंगचित्रं रेखाटायचे आणि अगदी शाळेत असल्यापासूनच त्यांनी 'मार्मिक' या ठाकरे कुटुंबाच्या व्यंगचित्र साप्ताहिकात व्यंगचित्र काढणं सुरू केलं. कालांतराने राज ठाकरे यांनी शिवसेनेचं काम हाती घेतलं आणि बाळासाहेबांसारखीच भाषणं देऊ लागले. त्यांनी लोकांच्या मनावर आपली छाप पाडायला सुरुवात केली.  2003 पर्यंत त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र हा बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी म्हणूनच पाहत होता. पण राजकारणच ते... 2003 सालच्या एका सकाळी महाबळेश्वरच्या पक्षीय अधिवेशनात राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो बहुमताने मार्गी लागला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले.


बाळासाहेबांनी असं का केलं असेल? याचं उत्तर तेव्हा मिळालं नसेल अनेकांना, पण आज कदाचित ते मिळू शकतं. पक्ष किंवा एक संस्था चालवण्यासाठी प्रशासकीय कौशल्य असणं फार महत्त्वाचं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ते उद्धव ठाकरेंमध्ये पाहिलं असावं. कारण जेव्हा 1989 साली 'सामना'ची स्थापना झाली, तेव्हा देखील उद्धव ठाकरेंनाच जबाबदारी देण्यात आली होती.


आज मनसेची पडझड पाहता राज ठाकरेंचं प्रशासकीय कौशल्य कुठतरी कमी पडल्यासारखं नक्कीच वाटतं. मनसे 17व्या वर्षात पदार्पण करत आहे. राज ठाकरे मुंबईत मनसेच्या शाखांचं उद्घाटन करत आहेत. पक्ष सुरू करत असताना राज यांच्याकडे सगळं काही होतं. कार्यकर्ता होता, नेते होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शिवसेनेचा इतिहास होता. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक समान धागा म्हणजे, दोन्ही संस्था या त्यांच्या स्थानिक शाखांवर अवलंबून आहेत. मनसे हेच करण्यात कमी पडली असावी का?


शरद पवार यांनी सकाळी लवकर उठण्याचा दिलेला सल्ला राज ठाकरेंनी ऐकला असता तर? नाशिक सारखा गड मनसेनं का गमावला? पुण्या-मुंबईत मनसेचं वजन का कमी झालं? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे, पक्षात प्रशासकीय कारभार नाही.


मनसेचा महाराष्ट्रवाद की हिंदुत्ववाद?


राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास पहिला तर तो समांतर दिसतो. म्हणजे शिवसेनेच्या सुरुवातीला 1968 साली ठाणे आणि 1969 साली मुंबई  मनपात मिळालेलं यश तर मनसेच्या सुरुवातीला 2009 साली निवडून आलेले 13 आमदार. बाळासाहेबांना देखील पक्ष सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच अटक झाली होती. तर राज यांनाही दुसऱ्याच वर्षी अटक झाली. बरं त्यानंतर, पुढील अनेक वर्षे दोन्ही पक्षांच्या हाती काहीच लागलं नाही. बाळासाहेब असो वा राज, दोघांनीही हिंदुत्वाची भूमिका आधीपासून धरून ठेवली होती. पण अधिकृतरित्या महाराष्ट्रवाद सोडून हिंदुत्व हाती घेतलं ते पक्षाच्या 14व्या वर्षी.


मनसेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनात म्हणजेच, 2020 साली पक्षानं कात टाकली आणि हिंदुत्वाची कास धरली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच 'जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो...'च्या ऐवजी 'हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो' अशी केली.


राज्यात 2019 साली सत्तांतर झालं आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी केलेला हा खटाटोप शिवसेनेवर भारी पडतो की काय अशी ही परिस्थिती निर्माण झाली. कारण सगळीकडून शिवसेनेने हिंदुत्वादाची भूमिका सोडल्याचे आरोप झाले. एकेकाळी हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं समीकरण होतं तर आज शिवसेनेला आरडाओरडा करून आम्ही हिंदुत्ववादीच आहोत असं सांगावं लागतंय.     


हिंदुत्वाची धुरा हाती घेण्याचा प्रयत्न


राज्यात हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून कोण काढणार? इथे एन्ट्री घेतली राज ठाकरे यांनी. आधीच त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसत असल्याच बोललं जातं आणि आता त्यात निर्माण झालेली ही पोकळी. राज ठाकरे यांनी ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाजत असलेलं CAA, NRC निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण सुद्धा केलं. पण मार्च 2020च्या दरम्यान राज्यात कोरोनाचं आगमन झालं आणि राज ठाकरे यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं.


आता 2022 साली देशपातळीवरचं राजकारण बदलू लागलं आहे. शिवसेनेनंसुद्धा राज्याबाहेर जाऊन पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना संपूर्ण ताकद लावून राष्ट्रीय राजकारणात उतरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले होते. त्यामध्ये राजकीय चर्चा ही झालीच असणार. दुसरीकडे संजय राऊतसुद्धा उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे इतर राज्यातील भाजपविरोधी पक्षांना एकत्र घेऊन येत्या काळात आघाडी तयार केली आणि त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं तर कुणाला ही धक्का बसणार नाही. पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होईल. शिवसेनेन एकीकडे कॉंग्रेसचा धरलेला हात आणि त्यात जर शिवसेना फुल टाईम राष्ट्रीय पक्ष झालाच तर तो आपोआप मराठी आणि महाराष्ट्रवादापासून दूर होईल. महाराष्ट्रात परप्रांतियांना शिव्या घालून इतर राज्यात शिवसेना मतं कशी मागणार?


आता याचा सर्वात मोठा फायदा होऊ शकतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. राज्यात सध्याच्या घडीला तरी शिवसेना आणि मनसे व्यतिरिक्त स्थानिक पक्ष नाही. त्यामुळे शिवसेना एक पाऊल पुढे गेली की, सगळा खेळ हा राज ठाकरे यांच्या हाती येतो.


 संयुक्त महाराष्ट्राचा लढा


50च्या दशकात झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा फक्त मुंबईसाठी नव्हता, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी होता. जरी तो लढा डाव्यांनी पुढे आणला असेल तरी त्या लढ्यात डावे आणि उजवे हे एकत्र होते. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने आचार्य अत्रेंच्या पत्रकासाठी व्यंगचित्र रेखाटली होती. पुरोगामी विचारांचे आणि राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार केशव ठाकरे हे या लढ्यातील मुख्य मंडळींपैकी एक होते. वर म्हटल्याप्रमाणे  तो लढा फक्त मुंबईसाठी नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी होता आणि जेव्हा 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झाला तेव्हा ही सर्व मंडळी दु:खात होती. कारण सीमेवरील काही मराठी भाषिक जनतेची गावं ही कर्नाटक राज्याला देण्यात आली होती. बेळगाव, कारवर, निपाणी अशा अनेक गावांना उभा महाराष्ट्रा मुकला होता.


संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपला नव्हता आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. पण हाती काहीच येत नव्हतं. त्यावेळी एका पक्षाची स्थापना झाली, त्या पक्षाचं नाव होत शिवसेना आणि त्याचे सर्वेसर्वा होते बाळ केशव ठाकरे. पक्ष स्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी बाळासाहेबांनी अनेकांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धार केला. बेळगाव, कारवर आणि सीमेवरील इतर सर्व मराठी भाषिक प्रांतांना महाराष्ट्रात आणण्याचं ठरवलं. त्यासाठी जागोजागी आंदोलन उभारण्यात आली. तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबई दौऱ्यावर असताना त्यांना शिवसेनेकडून निवेदन देण्याचा प्रयत्न झाला. परंतु मोरारजी देसाईंच्या ताफ्यानं शिवसैनिकांना चिरडलं आणि मुंबईत दंगलीची ठिणगी पेटली. जागोजागी तोडफोड आणि जाळपोळ होऊ लागली. पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले. पण शिवसैनिक काही थांबेना. शिवसेनेच्या नेते मंडळींना पोलिसांनी अटक करण्यास सुरुवात केली आणि अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्यादेखील दारावर पोलिसांची ठकठक झाली. अंदाजे 100 दिवस बाळासाहेब ठाकरे हे येरवडा तुरुंगात होते.


संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 108 हुतात्मे तर शिवसेनेचे या आंदोलनात 69 जणांनी जीव गमावला होता. पण संपूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आजही कायम आहे. सीमेवरील जनतेवर आजही अन्याय होतोय. पण आज त्यांना नेता नाही. स्थानिक नेते असले तरी त्यांच्या 'ठाकरे' या आडनावा इतकी ताकद नाही.


आज एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रवादाची पोकळी राज्यात निर्माण झाली आहे आणि ती भरण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे आणि संधी चालून आली आहे, असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाची भूमिका हाती घ्यावी की, महाराष्ट्रावादाची भूमिका घेऊन प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, 108 हुतात्मे आणि मृत पावलेल्या 69 मराठी जनांचं स्वप्न पूर्ण करावं हा त्यांच्या समोरील मोठा प्रश्न असेल.